उस्मानाबाद, रिपोर्टर
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणा-या शेतक-यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता आहे. नियमित कर्जपरतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, 2018-19 आणि 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येणार असुन या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतक-यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी दि. 23 ऑगस्ट 2022 पासुन करण्यात येणार आहे. योजना पुर्णत: ऑनलाईन पध्दतीने राबविली जाणार असून आधार क्रमांकानुसार दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत बँका योजनेस पात्र असलेल्या शेतक-यांच्या याद्या तयार करुन त्याचे लेखापरिक्षण करुन घेणार आहेत. सदर लेखापरिक्षण झालेल्या याद्या दि. 01 ते 05 सप्टेंबर 2022 या कालावधीत महा-आयटी मार्फत विकसीत संगणकीय प्रणालीवर अपलोड करावयाच्या आहेत.
योजनेअंतर्गत ज्या पात्र शेतक-यांची खाती आधार लिंक नसतील अशा शेतक-यांची यादी बॅक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर दि. 05. सप्टेंबर 2022 पुर्वी डकवण्यात येणार आहेत. योजनेअंतर्गत लाभाची रक्कम शेतक-यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तरी ज्या शेतक-यांची कर्जखाती/बचत खाती आधार लिंक नसतील अशा शेतक-यांनी त्यांची खाती आधार लिंक करुन घ्यावीत असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे
0 टिप्पण्या