रिपोर्टर
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठं भगदाड पडले. अनेक आमदार, खासदार आणि नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले, पण या परिस्थितीला छेद देत सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित अशा सामाजिक कार्यकर्त्या अशी सुषमा अंधारे यांची ओळख आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारेंना शिवबंधन बांधले. शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना उद्धव ठाकरेंनी शिवसेना उपनेत्या हे पद दिले आहे.
दरम्यान सुषमा अंधारे यांनी याआधी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती, यावर प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी उत्तर दिले. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, मी टीका केली होती, पण आज मनाने इकडे येत आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.पुरोगामी विचाराच्या असूनही तुम्ही इकडे कशा आलात, असे मला विचारण्यात येत आहे. उद्धव ठाकरे आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही, त्यादिवशी माझ्यासारखे अनेक दलित, मुस्लिम या ठिकाणी जोडले गेले. माझ्या डोक्यावर इडीचे ओझे नाही. मी बाबासाहेबांची लेक आहे, याच नात्याने मला घराघरात पोहोचायचे आहे,' असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले.उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तुम्ही आणि तुमच्याबरोबर सगळे सैनिक माझ्याबरोबर आले. तुम्ही युद्ध सुरू असताना आलात, तुमचे महत्त्व खूप आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. सुषमा अंधारे या 2019 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक होत्या. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा प्रचार केला होता.
0 टिप्पण्या