सोलापूर भाजपा अध्यक्षाच्या महिला आत्याचारावर भाजपा महिला नेत्या गप्प का? :- काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस

 

रिपोर्टर 

महिलांवर अन्याय, अत्याचाराची घटना उघड होताच तात्काळ त्याची दखल घेत आरोपीला शिक्षा व्हावी व पीडितेला न्याय मिळावा यासाठी भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ या नेहमीच तत्पर असतात. परंतु सोलापूर भाजपाचा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने स्वतः करूनही चित्रा वाघ गप्प का बसल्या आहेत? चित्रा वाघ यांच्यासह भाजपातील महिला नेत्यांचे मूग गिळून गप्प बसणे हा त्यांचा दुतोंडीपणा दाखवतो, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी लगावला आहे.

 

भाजपा पदाधिकाऱ्यांनी महिलांवर अत्याचार केले तर त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचे धाडस चित्रा वाघ यांच्यासह भाजपातील महिला नेत्या करत नाहीत. विरोधी पक्षातील एखाद्या पदाधिकाऱ्याने असा गुन्हा केल्याचे समजले असते तर चित्रा वाघ यांच्यासह भाजपातील अनेक महिला नेत्यांनी आगपाखड करुन आकाश पाताळ एक केले असते. कानाखाली आवाज काढण्याची भाषा केली असती. भाजपा व्यतिरिक्त इतर राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यावर  महिला अत्याचाराचे आरोप होताच चित्रा वाघ धावून गेल्या व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मैदानात उतरल्या होत्या.

भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार नवनीत राणा यांच्यासह भाजपातील इतर महिला नेत्या सोलापूरच्या भाजपा जिल्हाध्यक्षच्या कृष्णकृत्यावर पांघरून घालत आहेत. महिला अत्याचारावर पक्षीय नजरेतून पाहणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न असून चित्रा वाघ यांची भूमिका कातडी बचाव असल्याचे दिसत आहे. पीडितेला न्याय देण्यासाठी पुढे येऊन तीला मदत करणे अत्यंत चांगले काम आहे. आपल्या पक्षाच्या नेत्यांचा महिला अत्याचार या महिला नेत्यांना का दिसत नाही? या प्रकरणात फायद्याचे काही नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का? सोलापूरच्या घटनेवर चित्रा वाघ, नवनीत राणा यांच्यासह इतर भाजपा महिला नेत्यांचे सोयीस्कर मौन महिला अत्याच्यारा विरोधात लढण्याच्या त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते, असे राजहंस म्हणाले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या