हक्काच्या पीक विम्यासाठी शेतकरी स्वाक्षरी मोहीम..तातडीने अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार निवेदन..

 



 उस्मानाबाद रिपोर्टर 


 उच्च न्यायालयाचा निकाल होऊन ३ आठवडे झाले तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम वर्ग करण्यासाठी काहीही कार्यवाही होताना दिसत नाही. खरीप हंगाम पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज असताना यात होत असलेली दिरंगाई दुर्दैवी आहे. राज्य सरकारची न्यायालयीन लढाईपूर्वी व न्यायालयीन लढा सुरू असतानाची असहकार्याची भूमिका येथेही कायम असून पुढील दिरंगाई टाळण्यासाठी किमान आता तरी मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे विमा कंपनीला बाध्य करावे, यासाठी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन मा. मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असून या स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात आज दिनांक २९.०५.२०२२ रोजी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येडशी ता. उस्मानाबाद येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी रामलिंग नकाते, सूर्यकांत नलावडे, कल्याण इंगळे, दत्तात्रय नकाते यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन करण्यात आली.


 खरीपात उस्मानाबाद जिल्ह्यात झालेले पिकाचे नुकसान ना. उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः बघितले होते व ‘एकही नूकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही’ असा शब्द दिला होता. ‘तूमची परिस्थिती बघून वाऱ्यावर सोडून देणाऱ्यां पैकी मी नाही’ असे ही ते त्यावेळी म्हटले होते. परंतु संवेदनशील मुख्यमंत्र्यांचे शब्द दुर्दैवाने आजपर्यंत कृतीमध्ये उतरलेले नाहीत.


खरीप २०२० हंगामात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी उस्मानाबाद जिल्ह्यातील ३,५७,२८७ शेतकऱ्यांना ६ आठवड्याच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिले असून विमा कंपनीने न दिल्यास तद्नंतर राज्य शासनाने देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मात्र याबाबत अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने, खरीप पेरणी पूर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळावी याकरिता मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवून उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे बाध्य करण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.

मागील दीड वर्षापासून पिक विम्यासाठी सातत्याने संघर्ष सुरु आहे. मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाने आता शेतकरी सुखावला आहे, मात्र निकाल होवून ३ आठवडे झाले तरी देखील विमा कंपनीने याबाबतची प्रक्रिया सुरु केलेली नाही. त्यामुळे किमान आता तरी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विमा कंपनी व सर्व संबंधितांची बैठक बोलावून ६ आठवड्याच्या आत नकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास विमा कंपनीला बाध्य करावे, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचा विमा मिळवून घेण्यासाठी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्वाक्षरी कराव्यात असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अ‍ॅड. रामराजे जाधव, माजी प. स. उपसभापती संजय लोखंडे, गजानन नलावडे, सरपंच गोपाळ नागटिळक, उपसरपंच राहुल पताळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल अवधूत, किरण नकाते, नागेश शिंदे, उल्हास कंकाळ, अशोक देशमुख, बाजीराव देशमुख, सुनील वाघमारे, अनिल नलावडे, सोमनाथ लवटे, रामलिंग नकाते, सूर्यकांत नलावडे, कल्याण इंगळे, दत्तात्रय नकाते, रामकृष्ण शिनगारे, तानाजी तवले, शफिक पटेल, शिवलिंग नकाते, तानाजी काळे, गणेश पवार आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या