ठालेपाटलांची वृत्ती खाल्लेल्या घरचे वासे मोजण्याची..! नाशिकला झालेलेच उदगीर ला होणार का..?   

उस्मानाबाद रिपोर्टर 


नाशिकचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडल्यानंतर ठाले-पाटील यांनी घेतलेली भूमिका म्हणजे खाल्ल्या घरचे वासे मोजणारी प्रवृत्ती आहे की काय..? असा प्रश्न सर्वच मराठी सारस्वतांसमोर व मराठी माणसासमोर निर्माण झाला आहे. व याचीच पुनरावृत्ती उदगीर चे साहित्य संमेलन संपल्यानंतर ही होऊ शकते अशी शंका ठाले पाटलांचा मागचा अनुभव पाहता निर्माण झाली आहे. हे म्हणजे सर्व काही करून सवरून पंचतारांकित लाभ घेऊन, सुग्रास भोजनावळ्यांवर येथेच्छ ताव मारून हात पुसून झाल्यानंतर, ज्यांच्याकडून हा सगळा पाहुणचार घेतला, नंतर त्यांचीच मापे काढायची असा हा प्रकार आहे..!

   साहित्य संमेलन हे साधेपणाने व साहित्यिकांसाठी व्हावे ही महामंडळाची भूमिका अगदी रास्तच आहे. मात्र महामंडळाच्या भूमिकेला छेद देत स्वतःचा मनमानीपणा करून पंचतारांकित मौजमजा करून घ्यायची, व नंतर मग आयोजकांनी असे केले, तसे केले म्हणून त्यांच्यावरच ठपका ठेवत सोज्वळपणाचा आव आणायचा, आणि अध्यक्ष असूनही महामंडळाच्या भूमिकेला स्वतः छेद द्यायचा, हे कितपत समर्थनीय आहे..?

   नाशिकचे संमेलनही अगदी अशाच थाटामाटात पार पाडले, आणि नंतर मात्र ते संमेलन एकट्या भुजबळांचे झाले.. सर्वसामान्य लोकांचे राहिलेच नाही,अशी टीका करायची.. हे योग्य आहे का..? 'राजकीय व्यक्तींचा व्यासपीठावर वावर करून आयोजकांनी आमची फसवणूक केली' असे मत कौतुक रावांनी नाशिकचे संमेलन यथासांग पार पडल्यानंतर केले..! म्हणजे चक्क फसवणुकीचा आरोप आयोजकांवर केला..! साहित्य संमेलन कुठे द्यायचे ,यजमान पद कोणाला द्यायचे, याचा निर्णय घेणारे हेच. कार्यक्रम ठरवणारे हेच, पाहुणे ठरवणारे हेच, कार्यक्रम पत्रिकेतील शब्दनशब्द ठरवणारे हेच, आणि सर्व काही सुरळीत पार पडल्यानंतर टीका करणारेही हेच..! इतकी दुटप्पी भूमिका व रंग कसा बदलता येतो ! हे समजतच नाही. महामंडळाच्या नावाखाली स्वतःची हौसमौज  अगदी येथेच्छपणे भागवून घ्यायची.. परंतु ज्यांच्यासाठी हे साहित्य संमेलन असते त्या साहित्यिकांचे अस्तित्व कुठे दिसते की नाही याचा विचार तेव्हा नाही करायचा, तो करायचा संमेलन संपल्यानंतर. म्हणजे करायचं एक आणि बोलायचं एक ही कसली पद्धत..! सर्व साहित्यिकांना खरं तर हे समजत असतं, परंतु ते बिचारे करणार तरी काय आणि बोलणार तरी काय. कारण त्यांचा रोष ओढवून घेतला तर परत कधी कुठे निमंत्रण मिळेल का ? कधी कुठल्या पुरस्कारासाठी विचार होईल का ? कधी मान सन्मान मिळेल का ? अशा बऱ्याच भानगडी असतात. खरं तर जे दिसतं ते सांगायचं, बोलायचं व लिहायचं धाडस प्रत्येक साहित्यिकांनी दाखवायला हवं. आपण आपल्या साहित्याप्रती एकनिष्ठ राहायला हवं. साहित्य निर्मिती हे एक वरदान आहे जे कुणालाही प्राप्त नसतं. साहित्यनिर्मिती मधून समाजाला एक विचार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहित्यिकांकडून होत असतं. साहित्य माणूसपण व स्वाभिमान शिकवतं. म्हणून साहित्यिकांनी कुठल्याही मुजोरपणाला थारा न देता स्वाभिमानाने राहून आपण लिहिलेल्या शब्दांशी प्रामाणिक रहायला पाहिजे. आपली प्रतिभा ही आपणाला लाभलेली देणगी असते. त्यामुळे आपली साहित्य निर्मिती ही कोणा पदाधिकारी अथवा साहित्य मंडळावर अवलंबून कधीच नसते हे लक्षात घेऊन चालले पाहिजे. जे दर्जेदार आहे त्याला कुणीच अडवू शकत नाही, ते समाजापर्यंत जाणारंच यावर विश्वास हवा. परंतु शेवटी हे ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीवर आणि प्रकृतीवर अवलंबून आहे. आणि नेमका याच गोष्टींचा गैरफायदा अशा काही मंडळींकडून घेतला जातो. 

   नाशिकच्या आयोजकांवर फसवणुकीचा आरोप करणारे आता उदगीर चे साहित्य संमेलन संपल्यावर काय भूमिका घेतील ! की त्यांच्यावर ही नंतर फसवणुकीचा आरोप करतील ! कारण याही निमंत्रण पत्रिकेत नेत्यांचाच सुकाळ आहे. उस्मानाबादच्या साहित्य संमेलनात एकाही राजकीय व्यक्तीला पत्रिकेत व मंचावर ही स्थान देण्यात आले नव्हते.शासनाच्या ज्या खात्यामार्फत संमेलनासाठी 50 लक्ष रुपये दिले जातात त्या खात्याचे मंत्री ना. अमित देशमुख यांनाही खाली प्रेक्षकात बसावे लागले होते..! आता तर होणारे संमेलन हे लातूर जिल्ह्यातच आहे,मग आता तरी ना.अमित देशमुख मंचावर सन्मानित होतात की परत एकदा प्रेक्षकांत समोर बसतात हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

   आदरणीय जयंत नारळीकर यांची नाशिकच्या संमेलनाध्यक्षपदी निवड केली तेव्हा निवड करणारेही ठालेपाटीलच, कारण ते महामंडळाचे अध्यक्ष होते. आणि नंतर जयंत नारळीकर यांच्यावर टीका करणारेही ठाले-पाटीलच..! जयंत नारळीकर संमेलनाला येणारच नाहीत, असे मला कुणीच कल्पना दिली नाही असे म्हणताना ते स्वतःच महामंडळाचे अध्यक्ष आहेत हे विसरले होते की काय ! अध्यक्ष ते स्वतः असल्यामुळे या सर्व गोष्टींची जबाबदारी त्यांची असताना ते इतरांवर झटकून कशी काय देऊ शकतात..?

   एखाद्या राजकीय नेत्याला स्वागताध्यक्ष केले की संमेलन सर्वसाधारण लोकांचे राहत नाही, या त्यांच्याच स्वतःच्या भूमिकेवर ते उस्मानाबाद वगळता कुठे ठाम राहिले ? ही त्यांची भूमिका म्हणजे फक्त स्टेटमेंट पुरतीच मर्यादित दिसून येते. फक्त बोलून लोकांकडून व साहित्यिकांकडून वाहवा मिळवायची व नंतर मात्र हीच भूमिका सोयीस्करपणे विसरून जायची असा प्रकार आहे.

   खरंतर माय मराठीची सेवा करणाऱ्या छोट्या-मोठ्या अनेक संघटना आहेत ज्या अगदी निरपेक्षपणे जिल्हा, राज्य , देशस्तरावर माय मराठीची सातत्याने सेवा करत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शरद गोरे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद असेल, संजय नहार यांची सरहद संघटना, राजन खान यांची अक्षर मानव संघटना असेल, प्रा.गंगाधर पानतावणे सरांनी सुरू केलेले अस्मितादर्श साहित्य संमेलन, किशोर ढमालेंचे विद्रोही साहित्य संमेलन, राकेश वानखेडे यांचा प्रगतशील लेखक संघ, रानफूल साहित्य व्यासपीठ, गुराखी साहित्य संमेलन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन.. असे अनेक मंडळ व मंडळी आहेत जे काही दानशूर मंडळींची मदत घेऊन, तर काही स्वतःच्या खिशाला चाट लावून अविरतपणे माय मराठीची आपापल्या परीने जमेल तशी सेवा करत आहेत. स्वतःला मातृसंघटना म्हणवून घेणारी व शासनाकडून दरवर्षी 50 लक्ष रुपये अनुदान घेणारे हे महामंडळ मात्र साहित्यिकांसाठी,  साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी नेमके काय करत आहे ? शासनाचे अनुदान घेऊन कार्य मात्र लोकशाही ला अनुसरून चालते का ? याचा आढावा साहित्यिकांनी, मराठीप्रेमींनी व सरकारनेही घेण्याची आता वेळ आलेली आहे. शासनाच्या पैशावर स्वतःची हौसमौज, लाड पुरवून घेण्यापेक्षा शासनाने एकतर हे अनुदान बंद करावे, अन्यथा प्रामाणिकपणे साहित्यसेवा करणाऱ्या  सर्वच संघटनांना समप्रमाणात अर्थसाहाय्य तरी करण्याची आता वेळ आलेली आहे.

   नाशिकचा पाहुणचार यथेच्छ पणे स्वीकारून नंतर त्यांच्यावरच टीका केली, आरोप केले..! आता उदगीरच्या संमेलनातील हौसमौज भागवून घेतल्यानंतर नेमकी काय भूमिका घेतील ठाले-पाटील..? का त्यांच्यावरही मानभावीपणे  भपकेबाजपणाचा आरोप करतील ! हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..तुर्तास उदगीर संमेलनाला व सर्व सहभागी यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा...


   -  युवराज नळे, साहित्यिक, उस्मानाबाद

मो. ९६२३८५९५११

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या