डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक स्वरूपात झाली पाहिजे:माजी मंत्री बसवराज पाटील

 


 


           मुरूम: रिपोर्टर  


 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण मानव जातीसाठी काम केल्यामुळेच त्यांचे विचार संपूर्ण जगालाच तारक ठरले आहेत. त्यांच्या विचारामुळेच या देशात विविधतेतून एकता निर्माण झाली आहे. आंबेडकरांच्या विचारांची देवाण-घेवाण झाली पाहिजे. यासाठी त्यांची जयंती सार्वजनिक स्वरूपात झाली पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.                      

भिम नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती गुरुवारी (ता. १४) रोजी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हाडाचे सचिव राजकुमार सागर होते. या वेळी पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सिद्धेश्वर भालेराव, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, उपनगराध्यक्ष सहदेव कांबळे, नगरसेविका सुलभा अंबुसे, सुमन देडे, विजयश्री भालेराव, उल्हास घुरघुरे, प्रमोद कुलकर्णी, अशोक मिणीयार, डॉ. नितीन डागा आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी बसवराज पाटील यांच्या हस्ते महात्मा गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुताळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन व ध्वजारोहण करण्यात आले. राम कांबळे यांनी त्रिशरण व पंचशील म्हटले. राहुल लेझीम पथकाने आपली कला सादर केली. पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले की, मुरुमला ऐतिहासिक परंपरा आहे आणि या शहरांमध्ये खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते आहे, याचा आपल्या सर्वांना खूप अभिमान आहे. अध्यक्षीय समारोप प्रसंगी राजकुमार सागर म्हणाले की, बाबासाहेबांची जयंती जगभर साजरी होते तेव्हा आपण सर्वांनी त्यांचे विचार जोपासले पाहिजेत. या वेळी विजयकांत सागर, सिद्धेश्वर भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले. या जयंती मंडळाचे अध्यक्ष झुंबर बनसोडे, प्रणित गायकवाड, भगवान कांबळे, मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, प्रा. अण्णाराव कांबळे, प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे, राहुल गायकवाड, महेंद्र गायकवाड, प्रशांत मुरूमकर आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन विजय कांबळे तर आभार राहुल गायकवाड यांनी मानले. या वेळी परिसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या