श्री.तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शासनाकडे हस्तांतरण करावे - आ. राणाजगजितसिंह पाटील
उस्मानाबाद रिपोर्टर मराठवाडयासह उस्मानाबाद जिल्हयातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांची शासकीय शुल्कामध्ये तंत्रशिक्षणाची सोय होवून या भागाचा शैक्षणीक व आर्थिक विकास व्हावा यासाठी श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करावे, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांना या महाविद्यालयासाठी मेंटर (मार्गदर्शक) म्हणून नियुक्त करावे तसेच उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्राचे रुपांतर स्वतंत्र विद्यापीठात करावे अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

ना. सामंत उद्या सोलापूर येथे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अडी अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी बैठक घेणार आहेत. सदरील बैठीचा निरोप आजच प्राप्त झाला असून काही पुर्व नियोजित कामामुळे सदरील बैठकीला उपस्थित राहता येणे शक्य नसल्याने आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी फोनद्वारे त्यांच्याशी चर्चा केली व आजच पत्र देवून स्वतंत्र विद्यापीठ मंजुरी व  श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शासनाकडे हस्तांतरण या विषयांबाबत अवगत केले आहे.

श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान विश्वस्तांनी दि.२६/०५/२०१७ च्या विश्वस्त समिती बैठकीमध्ये सदरील महाविद्यालयात सध्या उपलब्ध असलेली चल व अचल संपत्ती, सर्व साधनसामग्री व कर्मचारी महाराष्ट्र शासनास हस्तांतरीत करण्याच्या ठरावास सर्वांनूमते मंजूरी दिली आहे. या अनुषंगाने सदरील महाविद्यालय शासनाने अधिगृहीत करावे यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. तुळजापुर येथे जागतिक दर्जाचे शेक्षणिक संकुल उभारण्या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी निर्णय घेतला होता व तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब यांनी याबाबत बैठकही घेतली होती.

महाविद्यालयातील प्रवेश वाढविण्याच्या अनुषंगाने येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व महाविद्यालयाचा दर्जा सुधारणेकरिता अभ्यासगट नेमून मार्गदर्शक म्हणून काम पाहण्याची विनंती अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे चे संचालक डॉ भारतकुमार अहुजा यांना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी  केली आहे. पुढील आठवयात ते महाविद्यालयास भेट देणार असून त्यांची मेंटर (मार्गदर्शक) म्हणून नियुक्ती करण्यासाठी आदेश देण्याची विनंती केली आहे.

उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, ही जिल्हावासीयांची अनेक दिवसाची मागणी आहे. स्वतंत्र विद्यापीठासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उस्मानाबाद चा समावेश आकांक्षित जिल्ह्यात असून येथील युवकांना विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण येथेच राहून घेता यावे यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची नितांत गरज आहे. अनेक विद्यार्थी शैक्षणिक खर्च पेलवत नसल्यामुळे बाहेर जात नाहीत.

त्यामुळे उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करण्याच्या अनुषंगाने उद्याच्या सोलापूर येथील बैठकीत चर्चा व्हावी व आवश्यक ती कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापुर शासनाकडे हस्तांतरित झाल्यास जिल्हयाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी मोठी मदत मिळणार असून सदरील महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरीत करुन घेण्याबाबत व अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांना या महाविद्यालयासाठी मेंटर (मार्गदर्शक) म्हणून नियुक्त करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत अशी आग्रही मागणी  आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या