कळंब / विलास मुळीक
येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवानिमित्त मंदिरामध्ये पाच दिवसाच्या मुक्कामासाठी आलेली आई येडेश्वरी देवीची पालखी गुरुवारी वाजत गाजत डोंगरावरील मुख्य मंदिरात परतली. घुगरी महाप्रसादाच्या वाटपा नंतर या यात्रा उत्सवाची सांगता करण्यात आली.यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी येरमाळ्यात पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
येडेश्वरी देवीचे चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवास 16 एप्रिल पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मंदिरामध्ये पाच दिवसाचा मुक्काम केल्यानंतर गुरुवारी दुपारी चार वाजता आमराई येथील मंदिरात देवीच्या पालखीची महापूजा व महाआरती त्यानंतर घुगरी प्रसादाची विधिवत पूजा देवीचे मानकरी यशवंत पाटील, अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर घुगरी च्या कट्ट्यावर घुगरी महाप्रसादाची विधीवत पूजा करून उपस्थित भक्तांना घुगरी चा प्रसाद वाटण्यात आला. प्रसाद वाटपनंतर पालखी चे मुख्य मंदिराच्या दिशेने प्रस्थान झाले. झांज,हलगी, संबळाच्या कडाक्यात पालखी परतीची वाट चालू लागली. पालखी परतीचा प्रवास करत असताना चुन्याच्या रानातून संभाजीनगर मध्ये दाखल झाली, त्यानंतर पुढे छत्रपती मार्केट,रोकडोबा मंदिर तसेच पुढे मुख्य बाजार चौकातून पालखी मार्गाने येडेश्वरी मंदिराच्या दिशेने प्रस्थान झाले.
पालखी परतीचा प्रवास करत असताना चौकाचौकांमध्ये रस्त्यावरती फुलांच्या पाकळ्या अंथरून मखमली रस्ते तयार करण्यात आले होते. तर सड्या रांगोळीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. पालखी अमराई मंदिरातून चुन्याच्या रानात आली तेव्हा फटाक्यांच्या अतिशबाजीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले.
गावातील नागरिकांनी पालखी गावातून जात असताना देवीचे मानकरी, पालखीचे खांदेकरी, पुजारी यांच्या पायावर पाणी घालत होते. पालखीतील परशुरामाला हळदी कुंकवाचा मळवट भरून लाह्या, चुरमुरे, बत्तासे, रेवढ्या, प्रसादाचे वाटप करण्यात येते.
यात्रेच्या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये कुस्ती स्पर्धा, पशुप्रदर्शन, आराध्यांचा गाण्यांचा मेळा, शोभेच्या दारूची अतिषबाजी, असे विवीध कार्यक्रम पार पडले. यादरम्यान महाराष्ट्रासह पर राज्यातून अलेल्या लाखो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखीला निरोप देण्यासाठी देवीचे मानकरी पुजारी खांदेकरी गावकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य मंदिराला चुन्याची रंगरंगोटी
यात्रेतील मुख्य आकर्षण व मानाचा विधी असलेल्या चुनखडी वेचण्याच्या दिवशी जेवढी चुनखडी जमते ती चुनखडी राशीवर गोळा करून तो चुना गोवऱ्यावर भाजला जातो.
पालखी जाण्याच्या दिवशी गावातील लोक राशीतून भाजलेला हा चुना वेचतात व पालखीसोबत एका सजवलेल्या मानाच्या बैलगाडीतून तो मंदिराकडे घेऊन जातात त्यानंतर दुसऱ्या दिवशी या भाजलेल्या चुन्याने येडेश्वरी देवीच्या मंदिराची रंगरंगोटी केली जाते. देवीच्या मंदिराला यात चुनखडीच्या रंगाचा मान आहे असं सांगितलं जातं. जिला चुना मंदिराकडे नेण्यासाठी वापरण्यात येणार्या बैलगाडीचा मान पूर्वीपासूनच वारिक (न्हावी) समाजातील मोरे कुटुंबीयांकडे आहे. बाबुषा मोरे, गणेश मोरे, अण्णा मोरे यांनी चूना पोहचवण्याचे काम पाहिले.
घूगरी गोळा करण्याचा मान उंबरदंड परिवाराकडून
गुरुवारी पार पडलेल्या घोगरी महाप्रसादासाठी लागणारी ज्वारी गहू हरभरा गुळ हे साहित्य गावांमध्ये फिरून गोळा केले जाते धान्य गोळा करण्याचा मान गावातील उंबर दंड कुटुंबाकडे आहे सध्या हामान दत्तात्रेय उंबर दंड यांच्याकडे असून त्यांचे कुटुंबीय पाच दिवस घरोघरी जाऊन महाप्रसादासाठी धान्य गोळा करतात.
ग्रामपंचायत कडून सन्मान
यात्रेची सांगता झाल्यानंतर ग्रामस्थ पालखीला निरोप देण्यासाठी ढासी जवळील वावरत पर्यन्त येतात. इथेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने यात्रा महोत्सव सुरळीत पर पाडण्यासाठी व्यवस्था करणाऱ्या प्रशासकीय,पोलीस, महसूल, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, बांधकाम विभाग, व महावितरण आणि इतर प्रशासकीय विभागाच्या प्रतिनिधीचे ग्रामपंचायत च्या वतीने यात्रा काळात सेवा दिल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी सर्व प्रशासनाचे कर्मचारी, पंचायत प्रशासन, पोलीस प्रशासनाचे कर्मचारी, देवस्थान प्रशासनाचे कर्मचारी पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक भक्त उपस्थित होते.
0 टिप्पण्या