जिल्हा शासकीय रुग्णालयातील पाण्याच्या टाकीला 11 लाख खर्च करून दुरवस्था:

 


  उस्मानाबाद:रिपोर्टर  

शासकीय जिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत आ. कैलास पाटील यांच्या आमदार स्थानिक निधीतून २०२१-२२ या सालात जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात जल शुद्धिकरण संयंत्र बसविले असून जलशुद्धीकरण संयंत्रासाठी खोलीचे बांधकाम केले आहे. यासाठी ११ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. याचा लोकार्पण सोहळा नुकताच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते व आ कैलास पाटील व नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र उद्घाटन सोहळा होताच काही दिवसांतच या ठिकाणी बांधण्यात आले पिण्याच्या पाण्याच्या नळाखाली पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या हौद्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट असल्यामुळे त्याला गळती लागली आहे. त्या हौद्यात पाणी साचले असून पाणी घेताना अडचणी येत आहेत. त्याची दुरुस्ती व देखभाल व्यवस्थित होत नाही. तसेच या परिसरात स्वच्छता देखील करण्यात येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी पाणी पिण्यास येणाऱ्या नागरिकांना जाण्या-येण्यासाठी आवश्यक असणारा रस्ता व्यवस्थित करणे क्रमप्राप्त होते. मात्र या ठिकाणी साधा रस्ता देखील व्यवस्थित तयार केला नसून घसरगुंडीची अवस्था चिखलामुळे झाली आहे. तसेच या ठिकाणाहून वाहून जाणारे पाणी व्यवस्थित गटारात सोडणे आवश्यक असताना ती व्यवस्था केलेली नाही किंवा पाईप टाकला नाही अथवा खोदकाम करून ते पाणी गटारांमध्ये जाण्यासाठी वाट करून दिलेली नाही. त्यामुळे ते पाणी रस्त्यावरच मोकळे सोडल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या अंगावर त्या घाण पाण्याचे शिंतोडे उडत असल्याने त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 


चौकट

निकृष्ट बांधकाम कशासाठी ?


पिण्याचे पाणी घेता यावे यासाठी बसविण्यात आलेल्या तोट्या देखील निखळण्याच्या मार्गावर आहेत. तर ज्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याची कोनशिला लावण्यात आलेले आहे. ती देखील निखळण्याच्या मार्गावर आहे. एकूणच करण्यात आलेल्या या बांधकामाचे निकृष्ट काम झाले असून तू निधी केवळ कागदोपत्री खर्च झाल्याचे भासवून कोणाच्या घशात गेला ? अशी चर्चा परिसरात होऊ लागली आहे.चौकट


 घाणीतच नातेवाईक करतात जेवण-  स्वच्छता मोहीम नावालाच


पिण्याच्या पाण्याच्या टाकी लगतच रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण करण्यासाठी कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी कचरा साचला आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्याच दिसून येत आहे. मात्र नातेवाईकांना नाईलाजास्तव याच कक्षाचा सहारा जेवण करण्यासाठी व बसण्यासाठी घ्यावा लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या