आर.पी.औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

 

रिपोर्टर 


डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल गडपाटी, उस्मानाबाद येथील आर.पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये डॉ. प्रतापसिंहजी  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिला मान्यवरांचा गौरव करून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून धनेश्वरी शिक्षण समूहाच्या संचालिका डॉ. शिल्पा पाटील मॅडम, नामवंत स्त्री रोग तज्ञ डॉ. दीपिका सस्ते मॅडम, उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक श्रीमती. हिना शेख, के. टी. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती. गीता सपकाळे, राष्ट्रीय हॉलीबॉलपटू कुमारी प्रतिक्षा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. शिल्पा मॅडम यांनी महिला सबलीकरण या विषयी विस्तृत पणे मार्गदर्शन केले. याच सोबत डॉ. दीपिका सस्ते मॅडम यांनी महिलांच्या आरोग्यविषयक च्या तक्रारी आणि तिने घ्यावयाचे काळजी याविषयी विद्यार्थिनींशी संवाद साधला. उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक श्रीमती. हिना शेख यांनी स्वतःचा जीवन प्रवास विषयी सांगत असताना त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या महिला गुरुंचे स्थान व सद्यस्थितीत विद्यार्थिनींच्या सामाजिक शैक्षणिक जीवनावर प्रकाश टाकला. श्रीमती. गीता सपकाळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षा विषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयामध्ये  आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. हर्षदा कसबे, भाग्यश्री घाडगे, सई जाधव व प्रणिता फाटक तर  प्रस्ताविक प्राध्यापिका विद्या माळी मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये  उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या