राज्य पोलीस दलातील ३८ हजार १६९ पोलीस नायक शिपायांना पदोन्नती देऊन त्यांची नियुक्ती थेट पोलीस हवालदार पदावर करण्यात येत आहे. राज्य शासनाने नायक शिपाई हे पद व्यपगत केल्यामुळे राज्य पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पोलिसांना पदोन्नती मिळाली असल्याचे दिसते.
राज्य पोलीस दलात जवळपास १ लाख ९७ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. गृह मंत्रालयाकडून नवीन पदोन्नती योजना लागू करण्यात आली असून राज्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला पोलीस अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.
गृह मंत्रालयाने पदोन्नतीसाठी पुनर्रचना केल्याने जवळपास ५१ हजार पोलिसांना लाभ होणार आहे. पुनर्रचनेनंतर पोलीस शिपायांची पदे १ लाख ८ हजार ५८, पोलीस हवालदारांची पदे ५१ हजार २१०, सहायक पोलीस उपनिरीक्षकांची पदे १७ हजार ७१ इतकी वाढवण्यात आली आहे. नव्या पदोन्नती संरचनेसुसार आता दहा वर्षांत थेट पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्याचा लाभ राज्यातील ३८ हजार १६९ पोलीस नाईक शिपायांना होणार आहेत. आता या सर्व नायक शिपाई यांना थेट हवालदार पदावर पदोन्नती मिळणार आहे.नागपूर शहर पोलीस दलात १७७६ पोलीस नायक शिपाई आहेत. गृह मंत्रालयाच्या नव्या पदोन्नती आदेशाने आता ते सर्व कर्मचारी थेट पोलीस हवालदार होणार आहेत.
तपास अधिकारी वाढणार पोलीस शिपाई ते पोलीस नायक शिपाई या पदावर काम करताना फौजदारी गुन्ह्याचे तपास करण्याचे अधिकार नसतात. तसेच पोलीस ठाण्यात स्टेशन डायरी अधिकारी पदावरही काम देण्यात येत नाहीत. ही सर्व कामे पोलीस हवालदारांना करण्याचे अधिकार आहेत. मात्र आता नायक यांना हवालदार पदावर बढती मिळत असल्याने फौजदारी गुन्ह्याचे तपास करण्याचे अधिकार मिळणार आहेत.
0 टिप्पण्या