मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारा पडण्याची शक्यता हवामान खात्याचा इशारा

 


रिपोर्टर 


राज्यात मंगळवारी (ता. ८) कोकणासह मध्य महाराष्ट्रात  तुरळक ठिकाणी पाऊस  पडला. दरम्यान बुधवारी (ता. ९) मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तुरळक भागात विजांच्या कडकडाटासह गारा  पडण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर कोकणात काही ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३३ ते ३७ अंशाच्या दरम्यान नोंदला जात आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चढ-उतार कायम आहे. मंगळवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३७ अंश सेल्सिअस तर, नीचांकी तापमानाची नोंद मालेगाव येथे १६.४ अंश सेल्सीअस इतकी झाली. धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत वीजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली असून, तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला आहे.

पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोकणापासून चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा आणि अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्र, गुजरातमध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील तुरळक भागात पावसाची शक्यता आहे, मात्र गुरुवारपासून (ता. १०) विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.

शहर आणि परिसरातही पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी शहरात १८.३ अंश सेल्सिअस इतक्या किमान तर ३४.३ कमाल तापमानाची नोंद झाली. शहरात मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. तसेच सायंकाळनंतर औंध, बाणेर, सांगवीसह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसभर ऊन सावलीचा खेळ कायम आहे. पुढील चार दिवस शहर आणि परिसरात ही स्थिती अशीच कायम राहणार असून मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर अंशतः ढगाळ वातावरण आणि त्यामुळे किमान तापमानात होणारी वाढ यामुळे पुणेकरांना उकाडा अधिक जाणवणार आहे. किमान तापमान हे २० ते २४ अंशांवर पोचू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या