जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत करा: डॉ.राम जाधव

                   मुरूम रिपोर्टर 


 सध्या सर्व क्षेत्रात प्रचंड स्पर्धा सुरु असून या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्य, चिकाटी व मेहनत महत्वाची आहे. यश तुमच्या पुढे आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काम केले नाही तर दुसऱ्यांच्या स्वप्नासाठी नक्की काम करावे लागेल. स्वतःची कार्यक्षमता ओळखून निर्णय घेता आला पाहिजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रचंड मेहनत करा असे प्रतिपादन उमरगा येथील दिशा अकादमीचे संचालक डॉ. राम जाधव यांनी केले.                 

श्री माधवराव पाटील  महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सुरू असलेल्या विशेष शिबीरा प्रसंगी सोमवार (ता.२८) रोजी आयोजित                    ' तरुणांसमोरील आव्हाने आणि नव्या संधी ' या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे होते. यावेळी उमरगा रोटरीचे माजी अध्यक्ष प्रवीण स्वामी, डॉ. शीला स्वामी, डॉ. जयश्री सोमवंशी, सहशिक्षक शाहूराज माने, डॉ. सुभाष हुलपल्ले, प्रा. प्रकाश कुलकर्णी, प्रा. अशोक बावगे, डॉ. राम बजगिरे, डॉ. विनायक रासुरे, प्रा. दिनकर बिराजदार, डॉ. विलास खडके, प्रा. मुकूंद धुळेकर, प्रा. राजकुमार तेलंग, प्रा. भूषण पाताळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.                   

पुढे बोलताना श्री जाधव म्हणाले की, चांगल्या संधी शोधताना वेळ, काळ आणि वय लागत नाही. सकारात्मक विचारच माणसाला प्रगतीच्या शिखरावरती पोहचवत असतात. ज्याप्रमाणे अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते त्याप्रमाणेच जीवनात यशस्वी होण्याकरिता गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज असते. जीवनात कोणतेही क्षेत्र लहान-मोठे नसते. त्याकडे आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो याला फार महत्व असते. यशस्वी तोच होतो ज्याला संधीचे सोने करता येते. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. महेश मोटे म्हणाले की, तरुणांनी महत्वकांक्षी बनून आव्हानाचा हसत-हसत मुकाबला केला पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहूण्यांचा परिचय प्रा. डॉ. रवि आळंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी तर आभार प्रा. डॉ. संध्या डांगे यांनी मानले. यावेळी विविध  शाखेतील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या