रिपोर्टर
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी विकसित करण्यात येत असलेल्या ॲपचा मसुदा तयार झाला असून, येत्या दोन आठवड्यांत या ॲपचे काम पूर्ण होणार आहे. हे ॲप मोबाईल आणि संगणकावर वापरता येणार आहे. शिक्षकांच्या बदल्या या ॲपच्या माध्यमातून येत्या मे महिन्यात ऑनलाइन होणार असल्याची माहिती ग्रामविकास विभागाच्यावतीने देण्यात आली.
ॲपच्या प्रगतीचा आढावा घेण्याचा आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना दिला होता. त्यानुसार त्यांनी या ॲपच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर आयुष प्रसाद यांनी ही याबाबत माहिती दिली.
आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या अॅपद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित केले जात आहे. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या पाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या अभ्यास गटाने सरकारला ही शिफारस केली होती. सरकारने ती स्वीकारत मोबाईल ॲप विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. बदलीचा अर्ज भरण्यापासून नियुक्तीचे आदेश देण्याची संपूर्ण प्रक्रिया यंदा या ॲपच्या माध्यमातून होणार आहे. परिणामी शिक्षकांना यंदा बदल्यांची प्रक्रिया घरबसल्या पाहता येणार आहे.
0 टिप्पण्या