राष्ट्रीय लोक आदालतीमध्ये जिल्ह्यातील 15 कोटी रुपयांचे रखडलेले दावे निकाली


उस्मानाबाद रिपोर्टर 


नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सेवा विधी प्राधिकरणाच्या वतीने काल उस्मानाबाद जिल्ह्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुमारे 15 कोटी रुपयांचे विविध प्रलंबित दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले.          


उस्मानाबाद मुख्यालयाच्या ठिकाणी रविवारी सकाळी  १०.०० वाजता  प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष के. आर. पेठकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने लोकअदालतीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा न्याधीश --एक एम. आर. नेरलेकर, जिल्हा न्याधीश -- दोन  व्ही. जी. मोहिते,  विशेष न्यायाधीश एस. डी. जगताप,  तदार्थ जिल्हा न्यायाधीश --१ पी. एच. कर्वे, तदर्थ  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण  आयोगाचे सदस्य सस्ते,  कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती. मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,  अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती. रुपाली डंबे-आवले, जिल्हा शासकीय अभियोक्ता शरद जाधवर, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष नितिन भोसले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत एस. यादव, सर्व न्यायीक अधिकारी, भूसंपादन अधिकारी, महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, विमा कंपनी अधिकारी, बँक अधिकारी, ग्रामसेवक, पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासाजे अधीक्षक ए. डी. घुले  यांनी केले. या लोकअदालतीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पक्षकारांना आणि उपस्थित सर्वाना सामाजिक अंतर ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या .  तसेच मास्कचे वाटपही करण्यात आले.


 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महिला सदस्य असलेले एक पॅनल तयार करण्यात आले होते , हे या लोक अदालतीचे वैशिष्ट्य ठरले .यात पॅनलप्रमुख म्हणून तिसरे स्तर दिवाणी  न्यायाधीश श्रीमती. एस. एस. माने होत्या. या पॅनलमध्ये दोन वैवाहिक प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात आले.ही प्रकरणे ब-याच दिवसांपासून न्यायालयामध्ये रखडलेले होती.या प्रकरणांमध्ये पती - पत्नीमध्ये तडजोड होवून  विस्कळित झालेल्या कुटूंबाने परत त्यांच्या  वैवाहिक जीवनास नव्याने सुरुवात केली. 


तसेच एका वृध्द महिलेच्या प्रकरणांमध्ये जिल्हा न्यायाधीश --2  व्ही. जी. मोहिते यांनी स्वतः वृध्द महिलेच्या गाडीपर्यंत जावून महिलेची ओळख पटवून घेवून त्यांच्या प्रकरणांमध्ये तडजोड केली.


मोटार अपघातामध्ये मयत संभाजी महादेव खाडे यांचे वारस पत्नी श्रीमती. शोभा संभाजी खाडे, अविवाहीत मुली, लहान मुलगा आणि मयताचे वयोवृध्द आई - वडील यांनी मोटार अपघात प्रकरण क्र. ३१४/२०१८ दावा दाखल केला होता. या दाव्यामध्ये या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोड झाली आणि मयताचे वारस पत्नी श्रीमती. शोभा संभाजी खाडे, अविवाहीत मुली, लहान मुलगा, आणि मयताचे वयोवृध्द आई - वडील यांना तडजोडीने ७० लाख रुपयांमध्ये  तडजोड झाली. या प्रकरणांतील गैरअर्जदार दि. न्यु. इंडिया अॅशुरन्स कंपनी लि.सोलापूरचे विभागीय व्यवस्थापक नरेश दोनता आणि व्यवस्थापक पुंडलिक अन्नम हे उपस्थित होते, त्यांनी या रक्कमेचा धनादेश तात्काळ तडजोड झाल्याक्षणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  के. आर. पेठकर यांच्याकडे सुपूर्त केला. उस्मानाबाद जिल्हयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मोटार अपघात प्रकरणांमध्ये एवढया मोठया रक्कमेची तडजोड झाली आणि  तडजोडीच्या रक्कमेचा धनादेश तात्काळ जमा करण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे त्याबद्दल न्यायाधीश पेठकर यांनी या कंपनीच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.


या प्रकरणी पॅनलप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश --2   व्ही. जी. मोहिते  यांनी काम पाहिले.या प्रकरणांतील मयताची आई ही वयोवृध्द असल्याने आणि त्यांना उठबस होत नसल्यामुळे न्यायाधीश मोहिते  यांनी या महिलेस तिच्या कारजवळ जावून या प्रकरणात तडजोडीबाबत विचारणा केली. त्यावर या वयोवृध्द महिलेने संमती दिली. या प्रकरणांतील दोन अर्जदारांची तडजोडीबाबत संमती आहे किंवा नाही याबाबत श्री. मोहिते  यांनी संबंधीतांना व्हिडीओ कॉन्फरन्सींगव्दारे विचारणा केली, त्यांनीही तडजोडीस संमती दिली.


उस्मानाबाद जिल्ह्यातून मोठया संख्येने प्रलंबित  १० हजार ५९२ आणि दावपूर्व  १० हजार ८९७ प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यासाठी या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबीत  १७२४ आणि  दावपूर्व  ४४९ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रलंबीत दिवाणी स्वरूपाची (१०१४), मोटार अपघात ,कामगार नुकसान भरपाई प्रलंबीत प्रकरणे (७३), भू-संपादन प्रलंबीत प्रकरणे (३६), फौजदारी तडजोडपात्र स्वरूपाची प्रलंबीत (८१), वैवाहिक संबंधीची प्रलंबीत (३८), धनादेशाची प्रलंबीत (१८४), वीज देयकाची दावापूर्व प्रकरणे (१८), बँकेची वादपूर्व प्रकरणे (१३१), नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची पाणीपट्टी तसेच घरपट्टीचे वादपूर्व प्रकरणे (१८५), ग्राहक तक्रार निवारण आयोगाची (१७) प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात आली. तसेच गुन्हा कबुलीच्या (२८१) प्रकरणांमध्ये आरोपींनी गुन्हायाची कबुली दिली. मोटार अपघात ,कामगार नुकसान भरपाई प्रकरणांमधील पक्षकारांना  ५६ लाख ८६ हजार५१९ रुपये नुकसान भरपाई देण्याबाबत तडजोड झाली.


या लोकअदालतीमध्ये धनादेश प्रकरणी फिर्यादी पक्षाला  ५ कोटी ५० लाख ३१ हजार ३८५ रुपयांची वसूली करून देण्यात आली. भू-संपादन प्रकरणांमध्ये   एक कोटी ४१ लाख ५३ हजार २६८ रुपयांच्या रक्कमेची तडजोड झाली आहे. तडजोडपात्र फौजदारी स्वरुपाच्या प्रलंबीत प्रकरणांत रक्कम  दोन ३४, हजार ८०२ हजार रुपयांच्या , दिवाणी स्वरुपाच्या प्रलंबीत प्रकरणामध्ये रक्कम  ११ कोटी २२ लाख १९ हजार ५२८ रुपये ,   वीज देयकाच्या वादपूर्व  प्रकरणांमध्ये ५ लाख ९ हजार ७०५ रुपये , बॅकेच्या वादपूर्व  प्रकरणांमध्ये रक्कम  एक कोटी १६ लाख ३१ हजार २४१ रुपये , नगर पालिका आणि  ग्रामपंचायतीची पाणीपट्टी घरपट्टीच्या प्रकरणांमध्ये रक्कम  १९, लाख १९ हजार २३९ रुपयांची तडजोड झाली. गुन्हा कबुलीची प्रकरणांमध्ये रक्कम एक लाख ३१ हजार ८०० रुपये दंड वसुल करण्यात आला.


तसेच वाहतुक नियमभंगाची एकुण ८७१ प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात अली  त्यामध्ये शासनखाती दंडापोटी रक्कम र तीन लाख ३१ हजार ८०० रुपये  जमा झाले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या