नगर जिल्हयात वीस वर्षांपासून फरार असलेल्या 68 आरोपींना पोलिसांनी केलं जेरबंदरिपोर्टर 

मागील वीस वर्षापासून न्यायालयाने फरार घोषित केलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक महिन्याच्या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 68 आरोपींना जेरबंद केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, नगर जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून फरार असलेल्या सुमारे चार हजार दोनशे आरोपींचा शोधही सुरू केला जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


 नगर जिल्ह्यामध्ये न्यायालयाने 45 फरार आरोपींचे जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. तर दुसरीकडे न्यायालयामध्ये हजर न राहिल्यामुळे 168 आरोपींविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट काढण्यात आले होते. अनेक आरोपी यामध्ये फरार होते. त्या आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत एक विशेष मोहीम राबवण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. या मोहिमेमध्ये 68 आरोपींना जेरबंद केले आहे. काही फरार आरोपी मयत झालेले असल्याने तशी नोंद न्यायालयात देण्यात आली आहे. ज्या गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही व अनेक जण गुन्हे करून ज्यांना शिक्षा झालेली आहे व ते पॅरोलवर सुटलेले आहेत, असे गुन्हेगार फरार होतात, अशांवर कायद्याचा धाक निर्माण व्हावा, या उद्देशाने ही मोहीम राबविली आहे. या अगोदर सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची मोहीम आम्ही राबवलेली होती. नगर जिल्ह्यामध्ये एकूण 4200 आरोपी गेल्या 30-40 वर्षांपासून फरार आहेत. त्याच्यासाठी सुद्धा विशेष मोहीम राबविणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या