परंडयात कुंभाराचा आवा लुटण्याचा धार्मिक कार्यक्रम संपन्न


परंडा रिपोर्टर 

जीवनात एकदा तरी काशी यात्रा करावी असे म्हटले जाते. तसेच सुवासिनी महिलांनी संक्रांतीला  एकवेळ कुंभाराचा आवा(भट्टी) लुटावा असे म्हणतात. त्यामुळे मनोकामना पूर्ण होतात व मोक्षाची वाट सापडते अशी श्रद्धा आहे.

तेव्हां संक्रांतीनिमित्त परंडा शहरात राजपूत गल्ली मधील सौ. माधुरी मधुकर लोखंडे यांनी त्यांच्या सुना सौ. ज्योती, सौ. किर्ती, सौ. अर्चना, सौ. रुपाली यांच्या सहकार्याने कुंभार गल्लीतील श्री. गोकुळ कुंभार यांचा आवा (भट्टी) लुटण्याचे आयोजन केले.

करोना चे सर्व शासकीय निर्बंध पाळीत 40 ते 50 सुवासिनी महिला ढोली-बाजाच्या गजरात मिरवणुकीने, प्रमुख रस्त्यावरून कुंभार गल्लीत सायंकाळी 5 वाजता पोहोंचल्या.  कल्याण स्वामी चे नि:सीम भक्त व परंडयातील प्रख्यात पुरोहित श्री. पुरुषोत्तम (तात्या) वैद्य यांचेकडून विधिवत आव्याची पूजा केली. सोन्याचे मंगळसुत्र, जोडवे, चुडे, बांगड्या, सुवासिनीच्या श्रृंगारवस्तु इत्यादी, श्री गोकुळ कुंभार व त्यांच्या पत्नीस संपूर्ण आहेर करण्यात आला.

 त्यानंतर उपस्थित सुवासिनींनी आव्याची लूट केली. लोखंडे कुटुंबीयांचे आप्तेष्ट, नातेवाईक, निमंत्रित महिला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित होत्या. या नवख्या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या