शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश



रिपोर्टर 


राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्याचे शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधानांना भेटणार आहे. खोटे दस्तावेज तयार करुन सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले.  


 सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध प्रश्नांसंबधी बैठकीनंतर पवार बोलत होते.यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र िशगणे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष  राजू शेट्टी,  रविकांत तुपकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.राज्यातील अतिवृष्टी बाधितांना राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या मदतीचे वाटप  सुरु आहे, त्याला गती देण्यात येईल.शेतकऱ्यांना दिलेले अनुदान तसेच आर्थिक मदत कोणत्याही परिस्थितीत बँकांनी रोखू नये. सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येऊ नये, याबाबतच्या सूचना संबंधित बँकांना देण्यात येतील. खोटे दस्तावेज तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे आदेशही पवार यांनी दिले. नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनी तयार करण्यासाठी रोजगार हमी योजनेसह ‘सीएसआर’ फंडातून मदत करण्याच्या सूचनाही पवार यांनी दिल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या