मच्छीमारांनी घेतला मत्स्य आयुक्त कार्यालयाचा कब्जा; जनशक्ती पक्षाच्या नेतृत्त्वाखाली सेंट्रल बिल्डींगवर चढून जोरदार आंदोलन






 उस्मानाबाद रिपोर्टर

सीना-कोळेगाव प्रकल्पात स्थानिक मच्छीमारांना परवाने देण्यास टाळाटळ करून मर्जीतील परप्रांतीय ठेकेदारांना ठेका दिल्याचा आरोप करत जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयात मच्छीमारांनी जोरदार आंदोलन केले.आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीला माशांचा हार घालून ठिय्या आंदोलन करून आयुक्तांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तरी देखील कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी चक्क जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या छतावर चढून निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सीना-कोळेगाव हा मोठा प्रकल्प असून येथील मच्छीमारीचा  ठेका सहायक आयुक्तांनी आपला हिसा असलेल्या ठेकेदाराला दिला असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. स्थानिक मच्छीमारांना अरेरावी करून आंध्र, बिहारमधील मजूर आणून व्यवसाय सुरू केल्याचा आरोपही आयुक्तांवर करण्यात आला आहे.  जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केले. सहायक आयुक्त कार्यालयात नसल्याने रिकाम्या खुर्चीला माशांचा हार घालण्यात आला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा अतुल खोपसे- पाटील यांनी दिला आहे. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते.
 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या