तुळजाभवानी मंदीर उघडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेवून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे आश्वासन

 


उस्मानाबाद:रिपोर्टर  


तुळजापूर शहरासह परिसरातील गावांचे अर्थकारण मुख्यत: तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून आहे. मंदिर बंद असल्याने छोटे व्यवसायीक व पुजारी  यांचे प्रचंड नुकसान होत असून बस व रेल्वे मध्ये एकत्रित तासनतास प्रवास चालतो मग धार्मिक स्थळेच बंद का? धार्मिक स्थळांबाबतच दुजाभाव का? असा प्रश्न उपस्थित करत कोरोना नियमांचे काटेकोर पालन करुन मंदिर उघडण्यास परवानगी घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पुजारी मंडळाच्या लाक्षणीय उपोषण स्थळी केले. 

देशातील इतर राज्यात धार्मिक स्थळे खुली आहेत, राज्यात मात्र धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी नाही. यामुळे मंदिरावर उपजिवीका अवलंबून असणाऱ्याचे आतोनात हाल होत आहेत. तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मातेचे शक्तीपीठ असून मागील दीड वर्षापासून मंदिर जवळपास बंदच आहे. जिल्हाधिकारी मंदिर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करुन भाविकांसाठी मंदिर खुले करणे शक्य आहे. तुळजापूर देवस्थानचा प्रशाद योजनेमध्ये समावेश करणे तसेच रेल्वेसाठी राज्याच्या हिश्यापोटी देय रक्कमेची तरतूद करणे या सारखी मोठी विकास कामे राज्य सरकारच्या स्तरावर प्रलंबीत आहेत. 

प्रशाद योजनेच्या माध्यमातून या भागाचा कायापालट होणार आहे. ही योजना संपूर्णत: केंद्रशासन अर्थसहाय्यीत असून राज्य सरकारने केवळ प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अनेकवेळा मागणी करुन देखील याबाबत बैठक बोलावली जात नाही. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी 50% वाट्याचे हमीपत्र देवून देखील निधीची तरतूद केली जात नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमीतजी शाह यांनी तुळजापूर तीर्थक्षेत्र जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करण्याची ग्वाही दिली आहे. यासाठी राज्य सरकारचे सहकार्य अपेक्षित असून या तीनही विषयांबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी उपोषणकर्त्याना  संबोधीत करतांना  केले. राज्याचे मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील असून आई तुळजाभवानीचे निस्सीम भक्त असल्याने ते आपल्याला निश्चितच सहकार्य करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या