कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा: ॲड,रेवण भोसले.

 


उस्मानाबाद 

कोरोना आरोग्य संकट, सुशांतसिंह राजपूत मृत्यु प्रकरण, धनंजय मुंडे यांच्या वरील आरोप, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, सचिन वाजे अटक प्रकरण, परमविरसिंह यांनी केलेले गंभीर आरोप, वनमंत्री संजय राठोड व ग्रहमंत्री अनिल देशमुख यांचे राजीनामे ,या सर्व घटनेमुळे राज्याच्या इतिहासाला काळिमा लागला आहे .त्यातच राज्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेलेली असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुर्चीला घट्टपणे चिकटून बसलेले आहेत. त्यामुळे आता राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी तातडीने केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे. अनिल देशमुख जाऊन दिलीप वळसे पाटील गृहमंत्रीपदी आले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे वसुली मोहीम थांबणार नाही. राज्याचे गृहमंत्री पोलीस आयुक्तांना प्रतिमहिना 100 कोटी रुपये एकट्या मुंबईतून वसूल करण्यास सांगत असतील तर जलसिंचन, महसूलसह इतर खात्यामार्फत प्रति महिना किती वसुलीचे टार्गेट त्या संबंधित मंत्र्यांकडून दिली जात असेल याची कल्पनाच न केलेली बरी आहे .एकंदरीतच महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात लूटमार केंद्रच उघडले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला लुटमारीपासून वाचवण्यासाठी राज्यपालांनी तात्काळ हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसल्यामुळे संविधानाच्या कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते .महाराष्ट्राचा  कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा तसा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वतःची तशी खात्री पटली तरी राष्ट्रपती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. गृहखाते हे अत्यंत संवेदनशील असून त्या खात्याच्या मंत्र्यालाच गंभीर आरोपामुळे राजीनामा द्यावा लागणे हे दुर्दैव आहे .मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले नसते तर गेंड्याची कातडी पांघरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या  गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला नसता असे स्पष्टपणे महाराष्ट्रातील जनतेला दिसत होते. पोलीस आयुक्तांनी थेट गृहमंत्र्यावर खंडणी वसुलीचे आरोप केल्यावर व उच्च न्यायालयाने सीबीआय कडे चौकशी दिल्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे या गंभीर घटनेकडे लक्ष देत नाहीत ,त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारंवार बदनाम करण्याचे षड्यंत्र आखत असल्याचे स्पष्टपणे दिसत असूनही मुख्यमंत्री त्यांच्यावर कसलीही कारवाई करताना दिसत नाहीत .राज्यातील प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ढेपाळले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील या ढासळलेल्या सर्व घटनेची इत्थंभूत माहिती राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी केंद्र सरकारला तात्काळ देऊन राज्यात तात्काळ राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी असे स्पष्ट मत ॲड भोसले यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या