कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पहिली ते आठवीचे सर्व विद्यार्थी पास करण्याची शिक्षणमंत्र्यांची घोषणा

रिपोर्टर काेरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर या संदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. खरे तर विद्यार्थ्यांचे वर्षभरातील शैक्षणिक मूल्यमापन करून त्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यायला हवा. मात्र, काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शिक्षण हे ऑनलाइन झाले.मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोनचा अभाव, शैक्षणिक सुविधांची कमतरता यांमुळे अनेक विद्यार्थी या सुविधांचा लाभ घेऊ शकले नाहीत. येत्या २ ते ३ दिवसांत एससीई आरटीकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देताना म्हणजे दिली जाणारी वर्गोन्नती कशी असेल, अंतर्गत मूल्यमापन कसे होईल, त्यासाठी कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असेल? याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती एससीईआरटी संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

नववीचे विद्यार्थी हे पुढच्या वर्षी दहावीला तर अकरावीचे विद्यार्थी पुढील वर्षी बारावीची महत्त्वाची परीक्षा देणार आहेत. त्यामुळे सध्याच्या वर्गातील त्यांचे मूल्यमापन महत्त्वाचे असल्याने या संदर्भातील निर्णयही येत्या काही दिवसांतच  जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या