आकांक्षीत उस्मानाबाद जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडा त्वरित करा - आमदार राणाजगजितसिंह पाटील

 देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अभिप्रेत असलेला आकांक्षीत उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास करण्यासाठी एकात्मिक विकास आराखडा त्वरित तयार करण्याच्या सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केल्या आहेत. विविध क्षेत्रातील तज्ञ आणि जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांच्या सहकार्याने उस्मानाबादच्या बलस्थानांचा विचार करून टाटा सामाजिक संस्था किंवा तत्सम संस्थेच्या मदतीने नीती आयोगाकडे सादर करण्यासाठी हा आराखडा तयार करण्याचे सूचित केले आहे.


देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून निती आयोगाने देशातील निवडक जिल्ह्यांना आकांक्षित जिल्ह्याचा दर्जा देवून त्या जिल्ह्यांच्या विकासाबाबत विशेष लक्ष केंद्रित केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करून निती आयोग तथा केंद्र शासनाकडे सादर करणे अपेक्षित आहे. जानेवारी २०१८ साली या योजनेची घोषणा करण्यात आली. मात्र या संकल्पनेला जवळपास 3 वर्षे उलटून देखील जिल्ह्यात समाधानकारक प्रगती दिसून येत नाही. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना एकत्रित करून जिल्ह्याचे वैशिष्ठ्य हे केंद्रबिंदू मानून नागरिकांच्या आकांक्षा लक्षात घेत सर्वांगीण विकास घडविणे हा या योजनेचा मुख्य हेतु आहे. आत्मनिर्भर भारत सारख्या व्यापक योजनेचा उस्मानाबादी शेळी चे संवर्धन व आनुषंगिक मूल्य वृद्धी असा प्रकल्प हाती घेवून जिल्ह्याचा आर्थिक दृष्ट्या कायापालट होवू शकतो. जिल्ह्याला लाभलेली वर्षभर स्वच्छ सूर्य प्रकाशाची देण योग्य पद्धतीने वापरुन अजून मोठ्या प्रमाणात सौर उर्जेवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभे करणे शक्य आहे.

 जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांनी एकत्रित येवून या आराखड्याचे प्रारूप तयार करणे अपेक्षित आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ अभ्यासकांसह टाटा सामाजिक संस्था अथवा तत्सम संस्थेकडून सादरीकरण तयार करण्यासाठी सहकार्य घेण्याचेही आमदार राणाजगजितसिंह यांनी सुचविले आहे. जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून खास बाब म्हणून यासाठी गरजेनुसार निधी उपलब्ध करून घेता येऊ शकेल.

 जिल्ह्याची बलस्थाने लक्षात घेवून जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून प्राधान्यक्रमासह हा आराखडा तयार करणे आवश्यक आहे. तातडीच्या,मध्यम व दीर्घ मुदतीच्या उपाय योजनांसह जिल्ह्याच्या आर्थिक विकासाकरिता अत्यावश्यक बाबींचा आराखड्यामध्ये समावेश गरजेचा आहे. रोजगार निर्मितीसाठी कौडगाव येथील औद्योगिक क्षेत्रात तांत्रिक कापड निर्मिती प्रकल्प व सोलार पार्कची निर्मिती, उस्मानाबादी शेळीचे संवर्धन व अनुषंगिक मूल्य वृद्धी, आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्ह्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील पाणी, मराठवाडा वॉटर ग्रिड, बंधारे दुरुस्ती, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग जलद गतीने पूर्ण करणे, जिल्ह्यात जागतिक दर्जाचे शैक्षणिक संकुल उभारणे, श्री. क्षेत्र तुळजापूर सह जिल्ह्यातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचा विकास यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व बाबी या आराखड्यात अंतर्भूत करण्याचे सूचित केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या