रुग्णांच्या संख्येवर लॉकडाउनचा निर्णय अवलंबून:उपमुख्यमंत्री

   




रिपोर्टर 

राज्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार अशी भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का? अशी चर्चा रंगली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारली नाही. तसेच, 'राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल', असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

पुण्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली.

अहमदाबादमध्ये रात्रीचे लॉकडाउन करण्यात आले आहे. राज्यातील परिस्थितींचा आढावा घेतला जात आहे. आणखी 10 ते 15 दिवस राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल', असेही अजित पवार म्हणाले.राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार का? असा सवाल केला असता अजितदादा म्हणाले की, 'परिस्थिती कशा प्रकारची समोर येणार हे त्यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे आताच मी काही घोषणा करणे योग्य ठरणार नाही. मी आज काही बोललो तर लोकं जास्त त्रस्त होतील. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या किती आणि कशी वाढते यावर पुढचा निर्णय अवलंबून असणार आहे.'

कोरोनाची खबरदारी घेण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे जे कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. ते सेंटर तातडीने सुरू करता येईल. व्हेंटिलेटर बेड, साधे बेड हे खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिले होते, आता जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर पूर्ण क्षमतेने सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल,असेही अजित पवार यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या