राज्यात काही ठिकाणी मुसळधार पडणार असल्याचा हवामानखात्याचा अंदाज

 
 

   रिपोर्टर: यंदा संपूर्ण राज्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पूरक पाऊस झाल्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या काही दिवसांतही राज्यात तुरळक पाऊस सुरू आहे. पण आता उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 

मान्सूनने पश्चिम राजस्थानामधून सुरू केलेला परतीचा प्रवास आता वेगाने पुढे जात असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मंगळवारी मान्सूनने उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. लवकरच महाराष्ट्रातूनही मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार आहे, अशी माहिती पुणे हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण गुजरात, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा अजूनही सक्रिय असल्यामुळे या भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डोंगराळ पट्ट्यातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
खरंतर, राज्यात यंदा झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे. मंगळवारीदेखील राज्यात अनेक भागात पाऊस सुरू होता. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे पावसाची उघडण्याची वाट पाहणाऱ्या बळीराजाने पिकांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी सगळा शेतमाल हा कोरड्या जागी ठेवून त्याला झाकून ठेवावं, जेणेकरून धान्याचं नुकसान होणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या