विद्यापीठ आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचे सरकारचे प्रयत्न


रिपोर्टर 

सध्या कोरोना काळात राज्य सरकार अनेक मोठे निर्णय घेण्यात व्यस्त आहे असे दिसते त्यात शासकीय कार्यालयाप्रमाणे विद्यापीठ आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.शनिवारी सुट्टी दिली तर शैक्षणिक आणि कार्यालयीन कामकाजावर काय परिणाम होईल, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत.राज्य सरकारने शैक्षणिक विभाग वगळता इतर विभागांना पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे.त्यामुळे या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाचे तास वाढले असले तरी लागून दोन दिवसांची हक्काची सुट्टी मिळत आहे. हाच नियम शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ यांना लागू करावा, अशी मागणी केली जात होती, परंतु अद्याप याबाबत सरकारने विचार केला नाही.सध्या नागरिकांच्या सोईसाठी महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी विद्यापीठातील कामकाज सुरू असते. पण प्रत्येक शनिवारी सुट्टी दिली तर बाहेर गावच्या विद्यार्थी, प्राध्यापकांची काही प्रमाणात अडचण येऊ शकते. यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.

पाच दिवसांचा आठवडा केल्यास विद्यार्थी, प्राध्यापक यांचा प्रवास कमी होऊन रस्त्यावरील वर्दळ कमी होईल. शनिवारी तासांची संख्या कमी असल्याने शहरी व ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते.या कारणांमुळे पाच दिवसांचा आठवडा करणे फायदेशीर ठरेल, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.सप्टेंबर महिन्यात विद्यापीठ व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करताना त्यामध्ये पाच दिवसांचा आठवडा जाहीर करा, अशी प्रमुख मागणी केली होती.

त्यामध्ये आंदोलनावर तोडगा काढताना याबाबत सकारात्मक विचार करू असा निर्णय घेऊ, असे आश्‍वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांच्या कुलसचिवांना पत्र पाठवून पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी अभिप्राय कळविण्यास सांगितला आहे. तर पुणे विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांनी त्यांचा अभिप्राय 14 ऑक्‍टोबर पर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या