राज्य सरकारने निश्चित केले सिटिस्कॅनचे दर



रिपोर्टर: 
राज्य सरकारने खासगी रुग्णालये आणि तपासणी सेंटरवरील सिटिस्कॅनचे दर निश्चित केले आहेत. त्यामुळे आता २ ते ३ हजार रुपयेच रुग्णांकडून आकारता येतील. यापेक्षा जास्त दर आकारणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.


कोविड, नॉन कोविड रुग्णांच्या अचूक निदानासाठी सिटिस्कॅन आवश्यक असते. त्यासाठी अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या. सरकारने याची दखल घेऊन राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीचा अहवाल सरकारने मान्य केला. १६ स्लाईडपेक्षा कमी सिटिस्कॅनसाठी दोन हजार, १६ ते ६४ स्लाईडच्या सिटिस्कॅनसाठी २५०० रुपये तर ६४ स्लाईडपेक्षा जास्त असणाºया सिटिस्कॅनसाठी ३००० रुपये आता आकारता येतील.


या रकमेत सिटिस्कॅन तपासणी, अहवाल, डिसइन्फेकटनट, पीपीई किट, सिटी फिल्म, सॅनिटायझेशन, जीएसटी यांचा समावेश असेल. हे दर नियमित व तातडीच्या तपासणीसाठी समान असून आदेश निघाल्यापासून लागू होतील. तपासणी अहवालात कोणत्या सिटिस्कॅनद्वारे तपासणी केली आहे ते नमूद करणे बंधनकारक असेल. ज्या रुग्णांकडे आरोग्य विमा आहे किंवा रुग्णालय, कार्पोरेट संस्थेने अशा तपासणी केंद्राशी संबंधित करार केला असल्यास हे दर लागू राहणार नाहीत.यासाठी रेडिओलॉजिस्टने रुग्णांना तपासणी अहवाल देणे आवश्यक असेल. याशिवाय नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय तपासणी होणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या