जेईई नीट परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची सरन्यायाधीशांकडे पत्राव्दारे मागणी


रिपोर्टर: कोरोना सारख्या महामारीच्या काळात जेईई आणि नीट परीक्षा घेऊ नयेत, त्या पुढे ढकलाव्यात, अशी मागणी सध्या जोर धरु लागली आहे. या मागणीसाठी विविध राज्यातील विद्यार्थी आणि पालकांनी जोरदार प्रयत्न सुरु केले असतानाच दोन विद्यार्थ्यानी याप्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडे पत्राव्दारे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.आता सरन्यायाधीश बोबडे याप्रकरणी काय निर्णय घेतात याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले आहे.
विधी शाखेतील तिस—या वर्षात शिकणा—या एका विद्यार्थ्याने आणि बारावीतील एका विद्यार्थ्याने मिळून बोबडे यांना हे पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकारच्या विरोधात जेईई आणि नीट परीक्षा घेण्याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात या विद्यार्थ्यांनी बोबडे यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारचा जेईई आणि नीट परीक्षा घेण्याचा निर्णय म्हणजे संविधानाच्या कलम 21चे उल्लंघन करणारा असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालण्यासारखे आहे. ज्यांनी या परीक्षांमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते स्वतःचा जीव धोक्यात घालत असल्याची भिती देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. सध्या कोरोनासारख्या महाभंयकर महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झालेला आहे. जगभरातील लाखोंना त्याचा फटका बसला आहे. जे यातून वाचले आहेत त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागणार असल्याचे सांगण्यात येते, असे असताना परीक्षेचा निर्णय घेणे कितपत योग्य आहे,असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या