कौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी


रिपोर्टर: : उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज गुरुवारी आदेश दिले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांची बदलीचे आदेश अद्याप निघाले नाही.

उस्मानाबादचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या संचालक पदी कार्यरत होते.
उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ-मुंडे यांच्या जागी कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे मूळचे लातूर जिल्ह्यातील दिवेगाव येथील रहिवाशी असून २०१२ मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत त्यांनी राज्यातून पहिला तर देशात १५ व्या क्रमांकाने यश मिळविले होते. प्रारंभी त्यांनी ठाणे येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर दिल्ली येथे वनपर्यावरण मंत्रालयात सहाय्यक सचिव, गडचिरोली येथे आदिवासी विकास प्रकल्पात प्रकल्प अधिकारी म्हणून प्रभावी काम केले. तेथील दुष्काळ, नियोजन, कृषी समस्या, आदिवासी जमिनी आणि आदिवासींचे हक्क यावर त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली होती. त्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी म्हणून दहा महिने आपली कारकिर्द गाजवली होती. लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर दिवेगावकर यांनी दुष्काळ नियोजन आणि पाणी नियोजनावर परिणामकारक काम करून, लातूरकरांना मोठा दिलासा दिला. त्यानंतर गतवर्षीपासून पुणे येथे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संचालकपदाचा कार्यभार ते सांभाळत होते.
सध्याचा पदाचा कार्यभार अप्पर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार श्रीमती मुधोळ मुंडे यांच्याकडून स्विकारण्याचे आदेशित केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या