पाच रुपये द्या आणि मद्य परवाना घ्या!


रिपोर्टर:नागपुर

चाहा ही मिळणार नाही एवढेच काय चनेफुटाणे सुध्दा पाच रुपयात मिळणार नाहीत; मात्र दारू पिण्याचा परवाना फक्त पाच रुपयात तुम्हाला कोणत्याही मद्याच्या दुकानात सहज मिळेल. त्यासाठी कोणती झंझटही नाही. सरकारच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यपींसाठी ही खास सोय करून दिली आहे. त्यामुळे दारू घेताना किंवा पिताना पोलिसांकडून पकडले जाण्याचा अजिबात धोका राहणार नाही.
मद्याची दुकाने सुरू झाल्याची बातमी मद्यपींना सुखावून गेली असतानाच मद्यासोबत मिळणारा परवाना मद्यपींसाठी बोनस ठरला आहे.नाही, हो म्हणता म्हणता अखेर राज्यातील बहुतांश ठिकाणी मद्याची दुकाने सुरू करण्यास शासन-प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे घसा ओला करण्यासाठी आसुसलेल्यांच्या मद्याच्या दुकानांसमोर रांगा बघायला मिळत आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी मद्याची दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली होती, परंतु नागपूर जिल्ह्यात मद्याची दुकाने सुरू करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने मद्यपी कमालीचे हवालदिल झाले होते. कधी एकदाचे मद्याचे दुकान सुरू होते आणि कधी यथेच्छ मद्यपान करतो, असे अनेकांचे झाले होते. अखेर त्यांची इच्छा पूर्ण झाली. प्रशासनाने विविध अटी, शर्ती टाकून मद्याची दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यामुळे शुक्रवारी भल्या सकाळपासूनच नागपूर शहर आणि ग्रामीणमधील मद्याच्या दुकानांसमोर मद्यपींची प्रचंड गर्दी झाली आहे. दुकाने सुरू झाल्याबरोबर अनेक शहरांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. नागपूर जिल्ह्यात तसे होऊ नये म्हणून प्रशासनाने विविध प्रकारच्या अटी घातल्या आहेत. पाचपेक्षा जास्त ग्राहकांची काऊंटरसमोर गर्दी राहणार नाही, त्यांच्यात शारीरिक अंतर पाळले जाईल, कोणताही गोंधळ उडू दिला जाणार नाही, अशी जबाबदारी मद्य विक्रेत्यांवर टाकण्यात आली आहे. दुसरीकडे मद्य विकत घेऊन जाताना पोलिसांनी अडवून कारवाई करू नये म्हणूनही मद्यपींची सोय करण्यात आली आहे. ज्याला कुणाला मद्य घ्यायचे आहे त्याला एक दिवसाचा तात्पुरता मद्य पिण्याचा, बाळगण्याचा परवानाही मद्याच्या दुकानातून उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. फक्त पाच रुपयात हा परवाना उपलब्ध करून दिला जात आहे. मद्याची किंमत मोजण्यासोबतच ग्राहकाने पाच रुपये द्यायचे आणि मद्याच्या परवान्याची पावती फाडून खिशात घालायची, अशी ही सुविधा आहे. त्यामुळे अनेक मद्यपी कोणत्याही कारवाईचे दडपण मनावर न ठेवता पाच रुपये देऊन त्याचा परवाना विकत घेत आहेत आणि मोकळ्या मनाने मद्यपान करीत आहेत!

होम डिलिव्हरीची अडचण
मद्याची घरपोच विक्रीसेवा (होम डिलिव्हरी) करण्यास परवानगी मिळाली असली तरी त्यासंबंधाने मद्य विक्रेते काहीसे गोंधळात आहेत. कारण घरपोच मद्य पुरविणार कसे, असा प्रश्न आहे. एका मद्य विक्रेत्याकडे जास्तीत जास्त पाच ते सात नोकर काम करतात. दुकानातून ते मद्याची ऑर्डर घेऊन निघाल्यास एका ग्राहकाला मद्य पोहोचवून परत दुकानात येण्यासाठी एका व्यक्तीला किमान पाऊण ते एक तास लागणार आहे.
एका तासात एक ग्राहक होत असेल तर या मद्यविक्रीचा मनासारखा फायदा होणार नाही, हे मद्य विक्रेत्यांच्या ध्यानात आले आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नोकरभरती करून घ्यावी लागणार आहे. असे केले तरी महागडे मद्य ग्राहकाच्या घरी पाठविले तर व्यवस्थित डिलिव्हरी होणार की नाही, हा धोका वजा प्रश्न मद्य विक्रेत्यांच्या डोक्यात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या