रिपोर्टर: करोना कक्षात उपचार घेत असलेल्या एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने शासकीय रूग्णालयात एकच गोंधळ उडाला.गुरुवारी सकाळी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना कक्षाच्या स्वच्छतागृहात हा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र स्वच्छतागृहात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उस्मानाबाद शहरातील विकास नगर भागातील एका व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणे दिसत असल्याने, त्याला जिल्हा रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. दाखल केल्यानंतर त्याचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील करोना कक्षात उपचारही सुरू करण्यात आले होते. त्याचा तपासणी अहवाल येण्याच्या आगोदरच ही घटना घडल्यामुळे शासकीय रूग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.गुरुवारी सकाळी हा संशयित रुग्ण स्वच्छतागृहात गेल्यानंतर बराच वेळ बाहेर आला नाही. ही बाब करोना कक्षात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर रुग्णालय प्रशानाने तात्काळ दखल घेत स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हाका मारल्या. मात्र आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर रुग्णालयातील कर्मचार्यांनी स्वच्छता गृहाचा दरवाजा तोडला असता, संशयित रुग्ण मृतावस्थेत आढळून आला. करोना कक्षात ही घटना घडल्यामुळे तातडीने पोलिसांना बोलावण्यात आले. या संशयित रुग्णाच्या स्वॅबचा अहवाल गुरूवारी येणार असल्याची माहीती मिळत आहे.शवविच्छेदन केल्यानंतर मृत्युचे नेमके कारण समोर येईल.
0 टिप्पण्या