मालिकांच्या फॅन्ससाठी खुशखबर, लवकरच सुरू होणार चित्रीकरण, पण अशा असणार अटी   रिपोर्टर:     कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मालिकांचे, चित्रपटांचे चित्रीकरण होत नसल्याने ज्युनिअर आर्टिस्ट, तंत्रज्ञ, हेअर स्टायलिस्ट, मेकअपमन यांची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळे आता सगळ्या गोष्टींचा विचार करता मालिकांचे चित्रीकरण लवकरच पुन्हा सुरू करण्याचा विचार फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयने केला आहे. जून महिन्याच्या अखेरीस मालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरू होऊ शकते असे म्हटले जात आहे. पण चित्रीकरण करण्यासाठी प्रोडक्शन हाऊससमोर काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयच्या अटींनुसार, मालिकेच्या सेटवर सगळ्यांनी मास्क घालणे बंधनकारक आहे. तसेच सॅनिटायझरचा सगळ्यांनी वापर करणे गरजेचे आहे. सेटवर मास्क वापरला जातोय की नाही हे पाहाण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती केली जाईल. तसेच कोरोनामुळे सेटवरील कोणत्याही कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना वाहिनी आणि निर्मात्यांकडून ५० लाखापर्यंतची मदत केली जावी... तसेच कोरोना झालेल्या रुग्णाचा सगळा खर्च देखील निर्माते आणि वाहिनी यांनी उचलावा... जेणेकरुन काम करताना कामगारांना काही झाले तर आपल्या कुटुंबाला मदत मिळणार की नाही याची त्यांना चिंता राहाणार नाही...

कोणत्याही मालिकेचे चित्रीकरण करताना सेटवर जवळजवळ १०० लोक असतात. पण त्याची संख्या कमी करून ५० लोकांनाच सेटवर एका वेळी बोलावले जावे... आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये इतर ५० लोकांना बोलावले जावे.... जेणेकरून सगळ्यांनाच रोजगार मिळेल. सेटवर नेहमीच एक रुग्णावाहिका असावी असे देखील सांगण्यात आले आहे. हे सगळे नियम जवळजवळ तीन महिने तरी पाळणे निर्मात्यांना आणि वाहिन्यांना बंधनकारक असणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या