शासकीय वाहनात मित्रांना दारुची पार्टी, सोलापुरात पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन, चौघांविरुद्ध गुन्हा

रिपोर्टर: लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. मात्र याचाच फायदा सोलापुरातल्या एका पोलिस कर्मचाऱ्यांने उचलला आहे. जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू असताना आपल्या मित्रांना या पोलिस कर्मचाऱ्याने शासकीय वाहनातून सफर घडवली आहे. इतकंच काय तर वाहनातच चक्क बिर्याणी आणि दारुची पार्टी देखील दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असताना सोलापुरात देखील पोलिस प्रशासनातर्फे उत्तम कामगिरी बजावली जात आहे. मात्र अशातच सोलापूर पोलिस दलातील मोटार परिवहन विभागातील एका कर्मचाऱ्याने आपल्या मित्रांना शासकीय वाहनात दारुची पार्टी घडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद सुर्यकांत दंतकाळे असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

पोलिस कॉन्स्टेबल विनोद दंतकाळे हे 6 एप्रिल रोजी जेलरोड पोलिस स्टेशन येथील पोलिसांच्या शासकीय वाहनावर चालक म्हणून कार्यरत होते. मात्र कर्तव्यावर असताना त्यांनी आपले मित्र केतन कसबे, राहुल शिंदे, सुमेध वाघमारे यांना शासकीय वाहनातूनच सोलापूर शहरातील विविध भागात फिरवले. त्यानंतर एका ठिकाणी थांबून शासकीय वाहनातच दारु आणि बिर्याणीची पार्टी केली.

धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार आरोपी केतन कसबे याने फेसबुक लाईव्हद्वारे प्रसारीत ही केला. तेव्हा सदरची घटना उघडकीस आली. पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आल्याचे समजताच आरोपी केतन कसबे याने आपल्या फेसबुकवरुन हा व्हिडीओ तात्काळ डिलीट देखील केला आहे. मात्र या आधी देखील केतन कसबे याने सार्वजनिक रस्त्यांवर फिरताना रिक्षामध्ये बिअर पितानाचा असाच एक व्हिडीओ प्रसारीत केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या