आहेत तिकडेच थांबा: कैद्यांना कारागृह प्रशासनाचे आदेशन्यायालयाने गुन्ह्यात शिक्षा ठोठावल्यानंतर कारागृहात डांबलेल्या कैद्याला वर्षातून एकदा संचित रजेचा तर वर्षातून दोन वेळा अभिवचन रजेचा लाभ मिळतो. संचित रजेची मुदत २१ ते २८ दिवसांची असते. तर अभिवचन रजेची मुदत ४५ दिवसांपर्यंत मिळते. नमूद रजेत संबंधित कैदी आपल्या गावात, आपल्या कुटुंबात जाऊ शकतो. विशिष्ट मुदतीनंतर त्याला कारागृहात परत यावे लागते. अपवादात्मक कारण वगळता तो कैदी नमूद तारखेवर परतला नाही तर त्याला पोलीस अटक करून कारागृहात डांबतात. त्यानंतर त्याला संचित किंवा अभिवचन रजेचा लाभ मिळत नाही. प्रत्येक कारागृहात विविध कैद्यांच्या संबंधाने संचित आणि अभिवचन वचन रजेवर सोडण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते. गेल्या महिनाभरात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून १२ कैदी संचित आणि अभिवचन रजेवर त्यांच्या त्यांच्या गावी गेले आहेत. संचित रजेवर जाणाऱ्यांची संख्या दोन असून त्यातील एक मुंबईचा तर दुसरा नागपूरचा आहे. तर अभिवचन रजेवर गेलेल्या १० कैद्यांमध्ये कोथरूड पुणे येथील १, वर्धा येथील १, मुंबई येथील २, गडचिरोली येथील ३ आणि नागपूर येथील ३ कैद्यांचा समावेश आहे. हे कैदी रजेवर कारागृहातून बाहेर गेल्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले आणि त्यामुळे एका वेगळ्याच वातावरणाची निर्मिती झाली. बाहेरून येणाºया कैद्यांमुळे कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या. राज्य कारागृह प्रशासनाने अभिवचन आणि संचित रजेवर बाहेर गेलेल्या कैद्यांच्या संबंधानेही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार ज्या शहरातील कैदी कारागृहातून बाहेर गेले त्यांनी त्याच शहराच्या कारागृहात नमूद अवधीनंतर हजर (जमा) व्हायचे आहे. अर्थात, नागपूरचा कैदी मुंबईला गेला तर त्याने परत नमूद मुदतीनंतर नागपूरच्या कारागृहात नव्हे तर मुंबईच्याच कारागृहात जमा व्हावे, असा हा आदेश आहे.
विशेष म्हणजे नागपूर कारागृहातून अभिवचन रजेवर बाहेर गेलेल्या कैद्यांमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याचाही समावेश आहे. तो १२ मार्चला अभिवचन रजेवर बाहेर गेला असून २७ एप्रिलला त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात परत यायचे होते. परंतु नव्या निर्णयानुसार त्याला स्थानिक कारागृह प्रशासनाने नागपूरला यायचे नाही, मुंबईच्याच कारागृहात २७ एप्रिलला जमा व्हावे, असे आदेश दिले असल्याची माहिती कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी  दिली. कारागृहातून रजेवर बाहेर गेलेल्या कैद्यांना त्या-त्या कारागृह प्रशासनाने असेच आदेश दिलेले आहेत.

लॉकडाऊनमुळे जेलयात्रा थांबली

लॉकडाऊनपूर्वी येथील मध्यवर्ती कारागृहातून रोज ४० ते ५० कैदी बाहेर जायचे. यातील काहींची तारीख असायची तर काहींच्या जामीन अर्जावर सुनावणी असल्यामुळे त्यांना न्यायालयात पाठविण्यात येत होते. त्यातील किमान पंचवीस ते तीस कैदी परत कारागृहात येत होते. वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक झालेल्या आणि न्यायालयाच्या आदेशानुसार कोठडी देण्यात आलेल्या दहा ते पंधरा कैद्यांचीही रोज कारागृहात एन्ट्री व्हायची. लॉकडाऊनमुळे ही प्रक्रियाच थंड पडली असून आता फार फार तर दोन किंवा तीन कैदी आतमध्ये येतात. त्यांची कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच तपासणी केली जाते. आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याशिवाय त्यांना आत घेतले जात नाही. थोडाही संशय आल्यास त्यांना कारागृहाच्या प्रवेशद्वारावरून थेट मेडिकलमध्ये पाठवण्यात येते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येते, असे अनुप कुमरे यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या