हावलदारांची चक्क रात्री दिड वाजता गृहमंत्र्यांशी शाब्दीक चकमक
मुंबई:रिपोर्टर 
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनच्या काळात  रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांकडून काही ठिकाणी अतिरेक होत असल्याची चर्चा सुरु असताना खूद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही त्याचा प्रत्यय आला. एका पोलीस हवालदाराने चक्क मध्यरात्री दीड वाजता त्यांना झोपेतून उठवून त्यांच्याशी फोनवरून हुज्जत घातली. मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाची गाडी अडविण्यावर हा वाद झाला. या अरेरावीबद्दल पोलीस हवालदाराची बुलढाणा पोलीस नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे. रवींद्र पोळ असे या हवालदाराचे नाव आहे, आठ दिवसात प्राथमिक चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


राज्यात कोरोनाच्या प्रादुभार्वाला रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर पाडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यासाठी पोलीस महामार्गाबरोबरच प्रमुख चौक आणि रस्त्यावर तैनात आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी स्वीय सहाय्यक वैभव तुमाने हे २९ मार्चला रात्री नागपूरहून मुंबईला येण्यासाठी निघाले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील चिखली रणथम येथील आंतरजिल्हा सीमावर्ती चेकपोस्ट नाक्यावर पोलिसांनी मोटार अडविल्यानंतर तुमाने यांनी आपली ओळख सांगून आवश्यक कामासाठी मुंबईला जात असल्याचे सांगितले. मात्र हवालदार पोळ यांनी त्याला आक्षेप घेत वाद घातला. वादावादी वाढतच राहिली. बराचवेळ सांगूनही गाडी सोडत नसल्याने त्यांनी अखेर गृहमंत्र्यांना मोबाईलवर फोन लावला. त्यावेळी रात्रीचे दीड वाजले होते. तुमाने यांनी मोबाईलचा स्पिकर सुरु ठेऊन पोळ यांना बोलण्यास दिले. हवालदार पोळ यांनी त्यांच्याशी उद्धटपणाची भाषा वापरली. अखेर खडसावल्यानंर पोळ यांनी तुमाने यांची गाडी सोडली.
गृहमंत्र्यांनी याबाबत बुलढाणाचे पोलीस प्रमुख डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांना सूचना दिल्या. त्यानुसार पोळ यांची बदली करण्यात आली.
राज्यात सध्या बिकट स्थिती असताना पोलिसांनी नागरिकांशी संयमाने वागावयास हवे. संबंधित पोलिसांचे वर्तन खात्याला अशोभनीय होते. असे पोलीसप्रमुखांना दिलेल्या पत्रात गृहमंत्री यांनी म्हटले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या