सोळा जिल्ह्यांतील उद्योगधंदे सुरू करावेत; उद्योग खात्याची शिफारस:

रिपोर्टर: : कोरोनाबाधित नसलेले अथवा केवळ एकच रुग्ण असलेल्या राज्यातील १६ जिल्ह्यांत उद्योगधंदे सुरू करता येतील, अशी शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसलेले ७ तर फक्त एकच रुग्ण असणारे ९ जिल्हे असल्याने ३५ पैकी १६ जिल्ह्यांमध्ये शेतीवर आधारित उद्योग तातडीने  सुरू करता येऊ शकतील. पाचपेक्षा कमी रुग्ण असणारे ४ जिल्हे आहेत, २१ तारखेपर्यंत ते निरीक्षणाखाली ठेवावेत व त्यानंतर त्यांनाही तशी परवानगी द्यावी. यामुळे अर्धे राज्य तातडीने मूळ पदावर येण्यास मदत होईल, असेही सुचविले आहे. हे मान्य झाल्यास १६ जिल्ह्यांत १५ तारखेपासून तर ४ जिल्ह्यांत व्यवहार २१ तारखेपासून पूर्वपदावर येतील. नंदूरबार, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, नांदेड व परभणी या सात जिल्ह्यांत एकही कोरोनाचा रुग्ण नाही. धुळे, जळगाव, सोलापूर, सिंधुदुर्ग, जालना, हिंगोली, बीड, वाशिम व गोंदिया या ९ जिल्ह्यांत फक्त एकच रुग्ण आढळला. त्यामुळे इथेही जिल्हा बंदी कायम ठेवून उद्योग व शेतीवर आधारित उद्योग सुरू करण्यास मान्यता देण्याची शिफारस बैठकीत केली.
उस्मानाबाद, यवतमाळ, पालघर व रायगड या चार जिल्ह्यांत रुग्णसंख्या ५ च्या आत असल्याने येथील रुग्णांचे प्रमाण २१ एप्रिलपर्यंत तपासून रुग्ण न वाढल्यास उद्योग सुरू करण्याची शिफारस केली आहे.

धान्य मार्केटमधील व्यापारी प्रतिनिधी, कामगार नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांच्यासह बाजार समिती अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी झाली. सर्वांना मान्य होईल अशी नियमावली बनवून मंगळवारी कोकण आयुक्त शिवाजी दौंड यांच्याकडे बैठक होईल. नंतरच या मार्केटबाबत निर्णय होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या