एका चोरामुळे १७ पोलीस, न्यायाधीश आणि कोर्टातील कर्मचाऱ्यांवर क्वारंटाइन होण्याची वेळरिपोर्टर: पंजाबमध्ये अटक करण्यात आलेल्या चोराला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर १७ पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. लुधियानामध्ये या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. फक्त पोलीस कर्मचारी नाही तर न्यायाधीश आणि न्यायालयातील कर्मचारी यांनाही स्वविलगीकरणात राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
पोलिसांनी वाहनांची चोरी करणाऱ्या २५ वर्षीय सौरव सेहगल अटक करुन ५ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केल होतं. जीवन नगर पोलीस ठाण्यात त्याला एका दिवसासाठी बंदिस्तही ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी दोन स्थानिकांच्या मदतीने चोराला अटक केली होती. पण त्याला करोना झाल्याचं निष्पन्न होताच त्याच्या कुटुंबातील ११ जणांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
६ एप्रिल रोजी न्यायाधीशांना सौरव सेहगलला ताप आणि खोकला असल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यांनी पोलिसांना त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी सौरव सेहगल आणि त्याच्या साथीदाराला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याआधी वैद्यकीय तपासणी करुन घेतली. यावेळी सौरवला करोना असल्याचं चाचणीत स्पष्ट झालं. यानंतर न्यायाधीश आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांना स्वविलगीकरणात जाण्यास सांगण्यात आलं आहे.

दरम्यान रुग्णालयात नेत असताना सौरवचा साथीदार नवज्योत सिंह याने पळ काढला. सोनसाखळी चोरी प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव आजारी वाटत होता, पण नवज्योतची प्रकृती चांगली होती. पण सौरवच्या संपर्कात आल्याने त्यालाही करोनाची लागण झाल्याची भीती असून पोलीस शोध घेत आहेत.
दहा पोलीस कर्मचारी चोराच्या संपर्कात आले होते ज्यामध्ये तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, दोन हेड कॉन्स्टेबल आणि दोन होम गार्ड यांचा समावेश आहे. दोन्ही चोरांना प्रेस नोटसाठी फोटो काढण्यासाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं. यावेळी त्यांचा संपर्क पोलीस निरीक्षक मोहम्मद जमील आणि हेड कॉन्स्टेबलसोबत आला. चोराला न्यायालय आणि रुग्णालयात नेताना तीन पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत होते. यामध्ये दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि एक होम गार्ड होता. तसंच फिंगरप्रिंट घेत असताना दोन कॉन्स्टेबल त्याच्या संपर्कात आले. यामध्ये एक महिला पोलीस कर्मचारी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या