रेल्वेच्या 20000 डब्यात होणार विलगीकरण कक्ष; पुण्यात काम सुरु

रिपोर्टर : कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी रेल्वेच्या डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्याचे काम पुण्यातही अल्पावधीतच सुरू होणार आहे.

रेल्वेच्या 20 हजार डब्यांमध्ये कोरोना संशयितांसाठी विलगीकरण कक्ष करण्याचा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर सुरू झाला आहे. पहिल्या टप्यात सुमारे 5 हजार डब्यांचे रूपांतर विलगीकरण कक्षांत होणार आहे. त्यातील 482 डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष मध्य रेल्वे तयार करणार आहे. त्याचे काम पुणे आणि मुंबईत लगेचच सुरु होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. एका डब्यामध्ये 16 जणांसाठी विलगीकरण कक्ष तयार होणार आहेत. त्या मुळे सुमारे 7 हजार संशयित रुग्णांची व्यवस्था होणार आहे.

गरज पडल्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी हे कक्ष हलविता येतील. त्यात वातानुकूलित यंत्रणेचा समावेश नसेल. कक्ष तयार करण्यासाठी केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत, त्या नुसार आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ते तयार होतील, अशी माहिती सुतार यांनी दिली. पंधरा वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान असलेले डबे रेल्वेने त्यासाठी निवडलेले आहेत.  रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा या बाबत म्हणाल्या," कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, रेल्वेने ही तयारी या पूर्वीच केली पाहिजे होती. हे कक्ष संशयित रुग्णांसाठी उपयुक्त ठरतील, याची खात्री आहे."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या