
रिपोर्टर: जगभरात कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्च रोजी 21 दिवसांचे ‘लॉकडाऊन’ जाहीर केले. यानंतर सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या उपाय योजना या पुढले 3 महिने लक्षात घेऊन करण्यात आल्या, यामुळे सोशल मीडियावर लॉकडाऊन वाढणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र लॉकडाऊन वाढवण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे कॅबिनेट सचिवांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 1100 पार गेला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 215 रुग्ण आहेत. पाठोपाठ केरळ, दिल्ली या राज्यांचा क्रमांक लागतो. मात्र असे असले तरी कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या 85 इतकी आहे. इतर देशांच्या तुलनेत कोरोना रुग्ण वाढण्याचा आकडा सर्वात कमी आहे. लोकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे कोरोना व्हायरसच्या प्रसाराची गती कमी ठेवण्यात केंद्र आणि राज्य सरकारांना यश आले आहे. मात्र याच दरम्यान लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काही वृत्त ही वाहिन्यांवरून देण्यात आले. अखेर कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी लॉकडाऊन संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘लॉकडाऊन वाढणार अशा वृत्तांमुळे आश्चर्याचा धक्काच बसला. लॉकडाऊन 21 दिवसांचाच असणार आहे. यात वाढ करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.
14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन अत्यंत काटेकोरपणे पाळण्यात येणार असून तसे आदेश आधीच राज्य सरकारांना देखील देण्यात आले आहेत. मजूर, रोजंदारीवर काम करणारे कामगार यांनी अन्य राज्यांमध्ये प्रवास करू नये म्हणून राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मजुरांना जेवण आणि तात्पुरती निवास व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकार देखील याची कडक अंमलबजावणी करत आहेत.
0 टिप्पण्या