तुळजाभवानी मंदिर परिसरही ‘कोरोना’ रोखण्यासाठी उपाय योजना:
तुळजापूर रिपोर्टर:  कोरोनाच्या संसर्गाला रोखण्याच्या दृष्टीने सर्वत्र पावले उचलली जात असताना आता तुळजाभवानी मंदिरातही खबरदारी घेतली जात आहे़ सध्या स्वच्छतेवर जास्त भर देण्यात आला असून, डिजीटल फलक तसेच मास्क वापराच्या अनुषंगाने हालचाली सुरु झाल्या आहेत़
चैत्री पौर्णिमा महिनाभरावर येऊन ठेपली आहे़ या काळात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते़ शिवाय, पाच दिवसांचा आठवडा झाल्यानेही सध्या भाविकांची वर्दळ दिसून येत आहे़ त्यातच कोरोनाने उचल खाल्ली असून, या संसर्गास रोखण्यासाठी संस्थानकडून पावले उचलली जात आहेत़ सध्या मंदिरातील सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत सक्त सूचना करण्यात आल्या आहेत़ मंदिर परिसराची दिवसभर स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़

शिवाय, याठिकाणी कर्नाटक, तेलंगणा राज्यातूनही भाविकांची गर्दी होत असते़ त्यामुळे मराठी भोषेसोबतच कन्नड व तेलगू भाषेतही संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबतचे डिजीटल फलक लावण्यात येणार असल्याचे तहसीलदार तथा व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी सांगितले़ दरम्यान, भाविकांना मास्क वापरण्याची सक्ती करण्याबाबतही विचार सुरु असल्याचे कळविण्यात आले़
तुळजापुरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने आयसोलेटेड वार्डाची स्थापना करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़जाधव यांनी सांगितले़ तसेच १२ डॉक्टरांची टीम उपलब्ध असून, औषधींचा स्टॉक करण्यात आल्याचेही ते म्हणाले़
तुळजापूर शहराच्या स्वच्छतेकडेही गांभिर्याने पाहिले जात आहे़ कोठेही कचरा जमा होणार नाही, याची काळजी घेण्यास स्वच्छता विभागास सूचित करण्यात आले आहे़ उघड्या नाल्यांवर जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे़ शिवाय, या विषयावर पालिका सदस्यांची विशेष बैैठक घेण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी सांगितले़

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या