रिपोर्टर
कोरोना विषाणुंचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठां पाठोपाठ मंदिरे बंद करण्याचे आदेश देण्यात आले, जत्रा, उरुस यावरदेखील बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र मशिदींमध्ये मोठ्या प्रमाणात नमाजसाठी गर्दी होत असल्याचे आढळून आल्यामुळे शासनाने याविरुध्द कठोर पाऊले उचलण्याचे स्थानिक प्रशासनाला आदेश दिले होते.
दरम्यान परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन मराठवाडा इमारते शरय्या या धार्मिक संघटनेने आधी अजानवर बंदी घातली होती, त्यानंतर टप्प्या टप्प्याने मशिदीतील नमाजवर बंदी घातली, मुस्लिम भाविकांनी मशिदीत नमाजसाठी येऊ नये यासाठी मशिद कर्मचाऱ्यानी मशिदीतील नमाज पढताना अंथरण्याच्या चादरीही गुंडाळुन ठेवल्या. बुधवारी दुपारी मशिदींमध्ये नमाजसाठी आलेल्या भाविकांना मशिद बंद केलेली असल्याचे सांगून परत पाठवण्यात आले. यानंतर आता शुक्रवारची नमाजही रद्द करण्यात आली आहे.
शुक्रवारची नमाज रद्द
शुक्रवारच्या नमाजसाठी मोठ्या प्रमाणात मशिदीत
गर्दी होत असल्याने गर्दीमुळे होणाऱ्या कोरोना विषाणूंचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी इमारते शरय्या संघटनेचे मराठवाडा अमीर मुफ्ती नईम यांनी शुक्रवारची नमाजही होणार नसल्याचे जाहीर केले. तसे सर्व मशिदींना आदेश पाठवले. प्रत्येक नमाजीने आपापल्या घरी शुक्रवारची नमाज पढावी, असे त्यांनी आवाहन केले. तसेच मशिदीमध्ये त्या त्या मशिदीचा मौज्जन आणि पेशइमाम हेच मशिदीत पूर्णवेळ थांबतील व आपले कर्तव्य पूर्ण करतील, असेही त्यांनी म्हटले आहे. संभाजीनगर शहरात पाचशे तर जिल्ह्यात एक हजार मशिदी आहेत.
0 टिप्पण्या