कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसायाला 800 कोटींचा फटका

रिपोर्टर: कोंबडी खाल्ल्याने कोरोनाची लागण होत असल्याची अफवा कोरोनाच्या विषाणूपेक्षा झपाटय़ाने व्हॉटस्ऍपवरून सर्वत्र पसरली आणि पोल्ट्री व्यवसाय डबघाईला आला आहे. व्हॉटस्ऍपवर हा खोटा मेसेज व्हायरल झाल्यामुळे 20 दिवसांत राज्यातील पोल्ट्री व्यवसायाचे 800 ते 900 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांवर प्रचंड मोठे आर्थिक संकट आले आहे.

महाराष्ट्रात सुमारे आठशे ते एक हजार मोठे पोल्ट्री फार्म आहेत. त्याशिवाय शेतीला पूरक जोडव्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करणाऱया शेतकऱयांची तर संख्या प्रचंड आहे. पोल्ट्री व्यवसायावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे एक लाखापेक्षा अधिक लोक अवलंबून आहे. पण चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यावर त्या देशात वुहानमध्ये कोंबडय़ा मारून टाकल्याचा मेसेज एक महिन्यापूर्वी व्हॉटस्ऍपवर व्हायरल झाला. कोंबडी खाल्ल्याने कोरोनाची लागण होते हा खोटा मेसेज कोरोनाच्या विषाणूपेक्षा प्रचंड वेगाने सर्वत्र झपाटय़ाने व्हायरल झाला आणि राज्यातील मांसाहारी लोकांनी कोंबडी खाणे बंद करून टाकले. मागील काही दिवसांपासून लोकांनी कोंबडीची अंडी खाणेही बंद केले. त्याचा मोठा फटका राज्यातील पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे.

ब्रॉयलरची 80 टक्क्यांनी मागणी घटली
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण अशा आसापासच्या भागात पूर्वी दररोज 8 ते 10 लाख किलो ब्रॉयलर चिकनची मागणी होती. व्हॉटस्ऍपवर खोटा मेसेज व्हायरल झाल्यावर सुरुवातीला ब्रॉयलर चिकनची मागणी 50 टक्क्यांनी घटली. आता तर 80 टक्क्यांनी कोंबडीच्या विक्रीत घट झाल्याची माहिती नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटीच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष मोरेश्वर देसाई यांनी दिली.

व्यावसायिकांना चिंता
कोरोनाच्या भीतीमुळे कोंबडी व अंडय़ांची मागणी घटल्याने मागील 20 दिवसात राज्यातील पोल्ट्री व्यवसायाचे 800 ते 900 कोटी रुपयांचे नुकसान झाले. या संकटातून पोल्ट्री व्यवसाय पुन्हा कसा सावरेल अशी चिंता व्यावसायिकांना सतावत असल्याचे ते म्हणाले.

अंडय़ांच्या विक्रीला फटका
मुंबई आणि परिसराला दररोज सरासरी दररोज सरासरी 65 लाख अंडय़ांचा पुरवठा होतो. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर अंडय़ांची मागणी 70 ते 75 लाख रुपयांवर जाते. पण कोरोनाच्या भीतीमुळे अंडय़ांची मागणी 50 टक्क्यांनी घटल्याची माहिती देसाई यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या