तुळजाभवानी संस्थानचे आधुनिकीकरण प्रगतीपथावर: आमदार राणाजगजितसिंह पाटील


भाविकांना सुविधा, पर्यटनाला चालना आणि अर्थकारणाला बळकटी देण्याचे प्रयत्न .

 उस्मानाबाद: रिपोर्टर 

तुळजाभवानी देवीचा महिमा विशद करणारा चित्रपट तयार करणे, प्रख्यात छायाचित्रकारांच्या मदतीने मंदिर आणि तुळजाभवानीची विलोभनीय छायाचित्रे भाविकांसाठी उपलब्ध करून देणे यांसह भाविकांच्या सोयी-सुविधा, पर्यटन व्यवसायासाठी दीर्घकालीन उपाययोजना आणि त्या माध्यमातून स्थानिक अर्थकरणाला बळकटी आदी विषयांना गती मिळाली आहे. देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थानचे आधुनिकीकरणाचा कार्यक्रम सध्या मिशन मोडवर घेण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. मंदिर समिती व शासकीय जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल निर्माण करण्याकरिता देखील मंदिर समितीने एकमताने निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
तुळजाभवानी मंदिर समितीच्या विश्वस्त मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार सौदागर तांदळे, नगराध्यक्ष चंद्रकांत कणे आणि मंदिर तहसीलदार तथा व्यवस्थापक योगीता कोल्हे आदींची उपस्थिती होती.
तुळजापूर येथे जागतिक दर्जाचे शैक्षणिक संकुल उभारण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता या बैठकीत शासकिय जमीन, मठ आणि मंदिर संस्थानच्या जागेची माहिती सादर करण्याबाबत तहसीलदारांना सूचित करण्यात आले. तुळजाभवानी चरणी मोठ्या श्रध्देने अर्पण केलेल्या सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंची तपासणी करण्याकरिता कंत्राटी सोनाराऐवजी धातू तपासणी यंत्र खरेदी करण्याचा निर्णय सर्वानुमते या बैठकीत घेण्यात आला. मुंबई येथील प्रभादेवी, सिध्दीविनायक मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान दागदागिने आणि वस्तूंचा लिलाव केला जातो. ती प्रक्रिया व तेथील दागदागिने, मौल्यवान वस्तूंची नोंदणी पध्दत याबाबतची सविस्तर माहिती संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घ्यावी, असा महत्वपूर्ण ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला असल्याचेही विश्वस्त आमदार पाटील यांनी सांगितले.
तुळजाभवानी देवीचा मुख्य गाभारा आणि सिंह गाभारा या ठिकाणी टाईल्स बसविल्यामुळे मंदिराचे पुरातन सौंदर्य लोप पावले आहे. त्याकरिता भींतींना चांदीचा पत्रा बसविण्याबाबत या बैठकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सूचना केली. देणगीदार अथवा मंदिर समितीमार्फत गाभार्‍यात आणि मंदिराबाहेर अत्याधुनिक आकर्षक विद्युत व्यवस्था करण्याबाबतही सर्वानुमते मान्यता देण्यात आली. मंदिर समितीचे उपलब्ध असलेले संकेतस्थळ आवश्यक तेवढे विकसित नाही. त्यात सर्व आधुनिक बाबींचा समावेश करून संकेतस्थळ नव्याने उपलब्ध करून देण्याची सूचना आमदार पाटील यांनी बैठकीत केली. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया राबवून संकेतस्थळ तयार करण्याबाबत मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी मंदिर संस्थानचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून संस्थानच्या अधिकार्‍यांना स्वतंत्र जबाबदारी देवून देशभरातील व राज्यातील इतर देवस्थानांना भेटी देवून त्या ठिकाणी उत्पन्नवाढीसाठी अंमलात आणली जाणारी प्रक्रिया समजून घेण्याबाबत सूचित केले. तसेच मंदिरावरील आर्थिक ताण कमी करण्याच्या दृष्टीने मोठ्या कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून स्वच्छता व सुरक्षिततेची कामे करण्याबाबत सूचित करण्यात आले.
अभियांत्रिकी महाविद्यालयाला अतिरिक्त निधी देणे, मंदिरातील सीसीटीव्हीची दुरूस्ती व देखभालीसाठी वार्षिक कंत्राट देणे, तुळजाभवानी मंदिरातील खजिना व जमादार खान्यातील अतिप्राचीन व ऐतिहासिक दागदागिने, मौल्यवान वस्तू, अलंकार, नाणी यांचा काळा बाजार आणि गैरव्यवहाराचा तपास तातडीने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात यावा याबाबत विधी व न्याय विभागाकडे पाठपुरावा करणे, मंदिराला सेवा-सुविधा देणार्‍या विविध ठेकेदारांनी कंत्राटी कर्मचार्‍यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन न दिल्यास  व सहाय्यक कामगार आयुक्तांनी सांगितलेल्या त्रुटी दूर न केल्यास करार एकतर्फी रद्द करण्याबाबतचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला असल्याचे संस्थानचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

साईबाबांप्रमाणे तुळजाभवानीचा महिमा व महात्म्य  चित्रपटातून देशभरातील भाविकांपर्यंत योग्य माध्यमांद्वारे पोहचविण्याकरिता मंदिर संस्थान सकारात्मक विचार करीत आहे. श्रीक्षेत्र अक्कलकोट, शेगाव, शिर्डी, मांढरदेवी या तीर्थक्षेत्रांनी देवी-देवतांचे महात्म्य असणारे चित्रपट निर्माण केल्यामुळे अलीकडील काळात या तिर्थक्षेत्रांना भेट देणार्‍या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्या धर्तीवर तुळजाभवानी देवीचा महिमा वर्णन करणारा चित्रपट निर्माण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बैठकीत दिल्या. त्याचप्रमाणे नवरात्रोत्सवाच्या कालावधीत तुुळजाभवानी देवीची विविध रूपांमधील अलंकार महापूजा मांडली जाते. या सर्व अलंकारिक रूपांचे व्यावसायिक छायाचित्रकारांच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे छायाचित्र काढून भाविकांना ते विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात यावे व त्याकरिता स्वतंत्र ई-निविदा मागविण्यात यावी, अशी सूचनाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या बैठकीत केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या