पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस मुंबई-पुणे सुरू होणार





     रिपोर्टरः येत्या 3 वर्षांत दिल्ली ते मुंबई महामार्गावर देखील इलेक्ट्रिक बस धावतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. मुंबई ते दिल्ली महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दिवाळीत दिल्ली ते जयपूर या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. दिल्ली ते मुंबई महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना फ़क्त 12 तासांत दिल्लीत पोहचणे शक्य होणार असल्याचा दावाही गडकरी यांनी केला.

मुंबई व पुण्यादरम्यान धावणार्याा पहिल्या खासगी इलेक्ट्रिक लक्झरी बसचे उद्घाटन शुक्रवारी मुंबईत गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्सतर्फे ही बस सुरू करण्यात आली असून ही भारतातील पहिलीच इलेक्ट्रिक इंटरसिटी बस ठरली आहे.

मागील चार ते पाच वर्षांपासून देशात इलेक्ट्रिक बसचे जाळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात इलेट्रिक बसेस सुरू झाल्यास तिकीट दरातही कपात होईल. इलेक्ट्रिक बस पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही महत्वाची आहे, त्यामुळे प्रदूषणही कमी होणार आहे. आगामी काळात देशात ई-महामार्ग तयार करण्याचाही आमचा विचार आहे. त्यादृष्टीने लवकरच  स्वीडन दौरा करणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. 
__________________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या