धर्मादाय रुग्णालयांना 'धर्मादाय' शब्द बंधनकारक:आयुक्तांचे आदेश
राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू .

राज्यातील बरीच रूग्णालये धर्मादाय आयुक्‍तालयाच्या अंतर्गत येत असल्याची कल्पना रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीतपणाकडे बघत घाबरतात.धर्मादाय रुग्णालये असली तरी कॉर्पोरेट बनलेल्या पंचतारांकित रुग्णालयांकडे ग्रामीण भागातील रूग्ण फिरकत नाहीत.त्यामुळे योग्य उपचारापासुन रूग्णांना वंचित रहावे लागते.या कारणासाठी धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी राज्यातील रुग्णालयांना त्यांच्या नावात "धर्मादाय' हा शब्द लावणे बंधनकारक केले आहे.

उंच उंच चकचकीत रुग्णालयात धर्मादाय आहे याची कल्पना अनेक रुग्णांना नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजनेपासून वंचित राहतात. पुढील काळात असे होऊ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पुण्यातील 56 धर्मादाय रुग्णालयांना "धर्मादाय' हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे.
शहरातील अनेक मोठ्या रुग्णालयांसह छोट्या अशा 56 रुग्णालयांचा धर्मादायमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर धर्मादाय कार्यालयाचे नियंत्रण आहे. म्हणूनच याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत पुणे हॉस्पिटल असोसिएशनला डिगे यांनी आदेश दिले आहेत. या 56 पैकी नऱ्हे येथील नवले रुग्णालयाने त्याची अंमलबजावणी केली असल्याची माहिती धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी दिली.

धर्मादाय शब्द लावण्याबाबतचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे. राज्यात एकूण 430 धर्मादाय रुग्णालये असून त्यांतर्गत दहा टक्के खाटा या 1 लाख 80 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी तर आणखी दहा टक्के खाटा या निर्धन 85 हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहेत. आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये 50 टक्के सवलत तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने 2003 मध्ये एका निकालाद्वारे केली आहे.

राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे "धर्मादाय' हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही याची माहिती होईल. वरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना उपचार घेता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या