डॉ. कसपटे यांच्या एनएमके 1 सिताफळ वाणास स्वामीत्व हक्क प्राप्त




एनएमके 1 सिताफळ वाण दुष्काळी भागासाठी ठरू शकते वरदान 

उस्मानाबाद, रिपोर्टर:   दि. 21 बार्शी तालुक्यातील डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांनी विकसित केलेल्या आणि जगभर प्रसिध्द होत असलेल्या एनएमके 1 (गोल्डन) या सिताफळ वाणास पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा कलम 2001 अन्वये स्वामीत्व हक्क प्राप्त झाला आहे. त्याचे अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झाले असून, या वाणाची किंवा त्यांचे नाव बदलून रोपांची विक्री करणार्‍या देशातील रोपवाटिकांवर कारवाई करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर अशा रोपवाटिकांवर लवकरच रितसर कारवाई करण्यात येईल असा इशारा डॉ. नवनाथ कसपटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ऍड. विक्रम सावळे, प्रविण कसपटे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. नवनाथ कसपटे म्हणाले की, त्यांना स्वामीत्व हे प्रमाणपत्र शेतकरी हक्क प्राधिकरणाकडून 22 नोव्हेंबर 2019 रोजी मिळाले असून, एनएमके 1 (गोल्डन) या सिताफळ वाणाची संपूर्ण मालकी डॉ. कसपटे यांची झाली आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय या वाणांच्या रोपांची निर्मिती, विक्री, जाहीरात, वितरण, आयात व निर्यात कोणालाही करता येणार नाही. विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या वाणाचे नाव बदलून उदा. गोल्डन, सुपर गोल्डन, ग्रीन गोल्डन, बळीराजा गोल्डन, लातूर गोल्डन रोपांची निर्मिती व विक्री करणार्‍या रोपवाटिकांमधील रोपांची निर्मिती व विक्री बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कृषी विभागाकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते स्वतंत्रपणे दिवाणी व फौजदारी दाखल करणार असून, कलम 72 अन्वये या अंतर्गत 3 वर्ष शिक्षा व 1 ते 5 लाखापर्यंत दंडही होवू शकतो असेही त्यांनी सांगितले. एकरी 340 झाडे लावून तिसर्‍या वर्षापासून उत्पन्न मिळत असून, वर्षाकाठी 4 ते 5 लाख रूपये उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे आजघडीला 42 वाण असून, 2500 नवीन वाण तयार करणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या