ठेकेदाराच्या कारभारामुळे महामार्गाची लागली वाट
रिपोर्टर:सुहास येडगे 

नळदुर्ग अक्कलकोट रस्त्याच्या कामाचा ठेकेदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा गलथान कारभार यामुळे नळदुर्गजवळील राष्ट्रीय महामार्गची पुर्णपणे वाट लागली आहे. काम सुरु असल्यामुळे या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडण्याबरोबरच संपूर्ण महामार्गावर चिखल पसरला आहे त्यामुळे महामार्गावरील वाहतुक नेहमीस विस्कळीत होत असून अनेकदा ट्रॅफीक जाम होवून महामार्गावर तब्बल चार किलोमीटर पेक्षा जास्त लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. यामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी शहर भाजपाचे अध्यक्ष पद्माकर घोडके यांनी केली आहे. सध्या नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याचे काम सुरु आहे ठेकेदाराकडून या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे असे असताना ठेकेदारांना चांगले काम करण्याची सुचना देण्याऐवजी संबंधित विभागाचे अधिकारी कामात अनियमितता करणाऱ्या ठेकेदारालाच पाठीशी घालत आहेत. रस्त्याचे इतके मोठे काम सुरु असताना ठेकेदार किंवा संबंधित विभागाकडून या ठिकाणी कामाच्या माहितीचा फलक अद्याप लावलेला नाही. वास्तविक पाहता शहरातील नागरीक, पत्रकार व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी रस्ता कामाच्या माहितीचा फलक लावण्याची वारंवार मागणी केलेली असतानाही याठिकाणी कामाच्या माहितीचा फलक अद्याप लावण्यात आलेला नाही. असेही पद्माकर घोडके यांनी म्हटले आहे.
सध्यातर या कामामुळे नळदुर्ग जवळील राष्ट्रीय महामार्गाची अक्षरश: वाताहत झाली आहे. सध्या या महामार्गावरुन जाणे म्हणजे आपला जीव मुठीत घेवून जाण्यासारखा आहे. कारण या महार्मावर अनेक ठिकाणी गुडघाभर खोलीचे खेड्डे पडले आहेत. त्यातच या ठेकेदारांने महामार्गावर मुरुम टाकल्याने व सध्या पडत असलेल्या पावसामुळे या माहामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल व गाळ साचला आहे. यामुळे दररोज याठिकाणी वाहतुकीची कोंडी होवून जवळपास महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. वास्तविक पाहता ठेकेदारांनी महामार्गाच्या एका बाजुने वाहतुक सुरु करीत असतांना हा रस्ता चांगल्याप्रकारे मजबुती करण करुन मगच या रस्त्यावरुन वाहतुक सुरु करणे गरजे होते. मात्र तसे झाले नसल्याने याठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी होत असून महामार्गावरील वाहतुक अतिशय संथगतीने सुरु आहे. नळदुर्ग जवळील गोलाई ते बसस्थानक हे एक किलोमिटरचे अंतर जाण्यासाठी वाहनांना तब्बल एक तासापेखा जासत वेळ लागत आहे. त्यामुळे नागरीक, वाहनचालक अक्षरश: वैतागले आहेत. तसेच वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागुन वाहने जाग्यावरच थांबत असल्याने महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांना दोन ते तीन किलोमीटर अंतर पायी चालत यावे लागत आहे. हि अतिशय दुर्देवाची बाबत आहे. नागरीक व वाहनचालकांना इतका त्रास होत असताना ठकेदार व अधिकारी मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाचा ठेकेदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी शहर भाजपाचे अध्यक्ष पद्माकर घोडके यांनी केली आहे. त्याच बरोबर आपण लवकरच या प्रकरणी ठेकेदार व संबंधित विभागावर अधिकाऱ्यावर रितसर पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचेही पद्माकर घोडके यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या