गावविकासासाठी लोकसहभाग आवश्यक-जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेरिपोर्टर: गावाचा विकास होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असून ज्या गावात लोकसहभाग वाढतो त्या ठिकाणी  प्रशासन सर्व प्रकारचे सहकार्य निश्चितच करील, असे उद्गार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज येथे काढले.

कळंब तालुक्यातील सापनाई येथे नेहरू युवा मंडळ, पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारणाच्या झालेल्या कामांची पाहणी करण्याकरिता गेल्यानंतर ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना जिल्‍हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे बोलत होत्या.यावेळी नेहरू युवा केंद्राचे श्री. रामचंद्र कुलकर्णी, ग्रामसेवक श्री. मंगेश वेदपाठक, नेहरू युवा केंद्राचे सुहास कांदे हे उपस्थित होते.

 गावांमध्ये नेहरू युवा मंडळाच्या युवकांनी एकत्र येऊन नदी खोलीकरण,सरळीकरण, वृक्षलागवड इत्यादी लोकोपयोगी कामे केली असून  याद्वारे गावातील पाणी गावातच,शिवारातील पाणी शिवारातच ही संकल्पना यशस्वी  करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये युवकांनी लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून 1 लाख 43 हजार खर्च केला आहे. या कामांमुळे पाणी जिरविण्यासाठीची मोठी प्रक्रिया सुरू झाली असून यामुळे गावातील तीन विहिरी, 25 बोअर सुरू झाल्या आहेत, अशी माहिती नेहरु युवा मंडळाचे अध्यक्ष श्री. सुहास कांदे यांनी दिली.

 जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, महिलांचा श्रमदानामध्ये आणि गावाच्या विकासामध्ये देखील सहभाग वाढविणे आवश्यक असून गावांमध्ये ग्रामसभा घेऊन पूर्ण कामाचा आराखडा तयार करा आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयात द्या. जेणेकरून भविष्यातील नियोजन करून लोकसहभाग व प्रशासन मिळून या गावातील पाणी प्रश्न तसेच वृक्षलागवड याशिवाय इतरही लोकोपयोगी कामांना गती देता येईल. यावेळी सापनाई येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या