चांगल्या उपक्रमाला प्रशासनाचे नेहमीच सहकार्य राहील - अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण


                                                             
   रिपोर्टर: सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या संस्था व व्यक्तीला प्रशासनाचे नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण यांनी केले. एकता फाउंडेशन,उस्मानाबाद व शिवार संसद युवा चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गोरोबाकाका पादुका मंदिर वाणेवाडी येथे आयोजित कीटकनाशक सुरक्षा किट व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
            यावेळी सिनेअभिनेता व चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे,जिल्हा माहिती आधिकारी मनोज सानप, जि. प. कृषी अधिकारी डॉ.टी.जे.चिमन्नशेट्टी, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, शिवार संसद संस्थेचे अध्यक्ष विनायक हेगाणा यांची प्रमुख उपस्थिती होती.
           शेतकरी हिताच्या उपक्रमांसोबत जलसंवर्धन आणि मृदासंवर्धन या ही गोष्टींकडे लक्ष दिले तर भविष्यात उभी राहणारी पाणीटंचाई आपणास कमी करता येईल, असेही मत यावेळी पराग सोमण यांनी व्यक्त केले. एकता फाउंडेशन उस्मानाबाद व शिवार संसद यांनी शेतकऱ्यांना वाटप करीत असलेल्या सुरक्षा किट मुळे शेतात फवारणी करताना होणारा त्रास कमी होईल व त्याच सोबत समस्त वाणेवाडी ग्रामस्थ यांनी वृक्ष लागवड, जलसंवर्धन मध्ये सहभागी होऊन आपले गाव पाणीदार करावे, असे आवाहन यावेळी पराग सोमण यांनी केले.
       विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरण्याचे प्रमाण कमी करून वाचनाकडे लक्ष दिल्यास स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यास वेळ लागणार नाही, असे मत सिनेअभिनेता भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केले. स्वतः कोणत्याही कामाची सुरुवात केली तर कोणतेही काम अशक्य नसून माणसाने स्वतःसोबत निसर्गरक्षणाकडेही लक्ष द्यावे. जर आपण निसर्गाची काळजी घेतली तरच निसर्ग आपली काळजी घेईल असे यावेळी सिनेअभिनेता भारत गणेशपुरे बोलताना म्हणाले.संस्थेने शेतकऱ्यांना सुरक्षा कीट वाटप करून शेतकऱ्यांच्या हिताचे काम केल्याबद्दल त्यांनी दोन्ही संस्थांचे कौतुक केले. कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करणे हा पर्याय नसून होणारा वायफळ खर्च शेतकऱ्यांनी कमी करावा व आयुष्यात कधीही निराश होऊ नका. जी व्यक्ती मोठ्या पदावर आहे, त्यांनी खूप हलाखीच्या परिस्थितीवर मात करून मोठे झाले आहे,त्यामुळे शेतकऱ्यांनी येणाऱ्या परिस्थितीवर हिमतीने मात करावी, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
         श्री. भारत गणेशपुरे यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे व अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण यांच्या संकल्पनेतून जिल्हा माहिती आधिकारी  मनोज सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एकता फाउंडेशन व शिवार संसद च्या वतीने लोकराज्य या शासकीय मासिकाचे वितरण, या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.
          शेतकऱ्यांनी सुरक्षा किट वापरले तर पुढे होणारा धोका टळणार असून फवारणी करताना शेतकऱ्यांनी वाटप केलेली सुरक्षा किट फवारताना वापरावे, असे आवाहन जि.प.चे कृषी अधिकारी डॉ.टी.जे.चिमन्नशेट्टी यांनी केले. त्याचबरोबर सुरक्षा किट फवारताना कशी वापरायची याबाबतचे प्रात्यक्षिही यावेळी त्यांनी करून दाखवले.
          कार्यक्रमाची सुरुवात जि. प. शाळा वाणेवाडी येथे वृक्षारोपण करून झाली. सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी सर्व मान्यवरांचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केले. आजपर्यत एकता फाऊंडेशने केलेल्या सर्व कामाचा आढावा सांगत वाणेवाडीला एकता फाऊंडेशन च्या वतीने सर्वातोपरी सहकार्य करण्याची ग्वाही एकता फाऊंडेशनचे सचिव आभिलाष लोमटे यांनी प्रास्ताविक भाषणात दिली.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुभाष हिंगमिरे यांनी केले. यावेळी एकता फाउंडेशनचे कार्याध्यक्ष विशाल थोरात, उपसरपंच प्रमोद उंबरे, एकता फाउंडेशनचे सचिव अभिलाष लोमटे, सचिन बारस्कर, आनंद खडके, यशवंत लोमटे, आदित्य लगदिवे, किरण वारे पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,कृषी महाविद्यालय गडपाटी व किणी येथील सर्व कृषिदूत, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व समस्त वाणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या