पांगरदरवाडी शाळेतील बालवारकर्यांनी केले पालखी व दिंडी सोहळ्यातून जनप्रबोधनरिपोर्टर: "तुझिया नामाची शाळा भरली,पंढरी हसली गोड किती! माऊली माऊली शाळा गरजली!!"
       असा विठुनामाचा गजर करीत आज दि.11/7/2019 रोजी पांगरदरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळी 10:00 वा.आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याबरोबरच ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी काढत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी पालखीत श्री.विठ्ठल-रखुमाईची प्रतिमा व शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके ठेवण्यात आली होती.पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे.वारी ही साधना असून दिंडी हे एक साधन आहे.सातत्य,नियमितपणा व सामूहिक भक्ती ही वारीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
     शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारश्याची जाण आसावी त्याचबरोबर दिंडीतील सर्वांच्या सहभागातून धार्मिक सलोखा व धर्मनिरपेक्षता या संविधानात्मक तत्वांतून राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण व्हावी व त्यांच्यात अंगीभूत असणारी उपक्रमशीलता वाढीस लागावी या हेतूने आषाढी एकादशीनिमित्त या दिंडीचे आयोजन करण्यात आले.पालखी सोहळ्याबरोबरच काढलेल्या ग्रंथदिंडीतून समाजात शिक्षणाचा प्रसार होऊन कार्यकारणभाव वृद्धिंगत व्हावा तसेच पर्यावरणपूरक  वृक्षदिंडीतून समाजाचे निसर्ग वाचविण्यासाठी उद्बोधन व्हावे,याकरिता या तीनही दिंड्या संयुक्तरीत्या काढीत शाळेतील बालवारकरी यांनी अवघे गाव भक्तिमय व ज्ञानमय केले.शाळेपासून निघालेल्या या दिंडीत प्रारंभी भगवा ध्वज घेऊन नाचणारे बालवारकरी,त्यांच्यामागे विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिरुपातील विद्यार्थी,नंतर टाळकरी,मध्येच मृदंगवादक,वीणेकरी व नंतर डोक्यावर ग्रंथ ,तुळशी व रोपे घेऊन आलेल्या बालमहिला वारकरींसह सर्व विद्यार्थी 'विठूनामाचा'जयघोष करीत---'सोपे वर्म आम्हा सांगितले संती!टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा!' या उक्तिप्रमाणे पाऊल खेळत गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापाशी ही दिंडी स्थिरावली.यावेळी येथे गावातील काही महिला भजनी मंडळांनी अभंग म्हणत अवघा परिसर भक्तिमय केला.बालवारकर्यांच्या झिम्मा-फुगड्यांसोबत शाळेतील शिक्षक श्री.राजेश धोंगडे व हर्षवर्धन माळी यांनी मृदंगाच्या तालावर धरलेला फेर व फुगडी पाहून उपस्थितांनी दाद दिली.शेवटी "आजी म्या देखिली पंढरी!नाचताती वारकरी,भार पताकांचे करी,भीमातीरी आनंद!!" असे गात ही बालदिंडी शाळेकडे मार्गस्थ झाली.दिंडीसाठी राजेश धोंगडे,माळी सर ,अनिल हंगरकर,शांताराम कुंभार,कोळी सर,पैकेकरी सर,कोरबू व मगर  यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या